कंगना रणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सतत या ना त्या कारणामुळे हा चित्रपट चर्चेत येत आहे. चित्रपटाचं प्रमोशन सुरु असताना कंगनाचा पत्रकारांसोबत वाद झाला होता. हे प्रकरण आता कुठे शांत होत असतानाच पुन्हा एक नवा वाद उद्भवला आहे. चित्रपट मेकर्सवर ‘जजमेंटल है क्या’च्या पोस्टरची संकल्पना चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हंगेरीमधील छायाचित्रकार आणि व्हिज्यु आर्टिस्ट फ्लोरा बोरसीने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सवर पोस्टर चोरी केल्याचा आरोप केला आहे. ‘जजमेंटल है क्या’च्या एका पोस्टरमध्ये कंगनाच्या चेहऱ्यावरील अर्धा भागावर एक काळ्या रंगाची मांजर दिसून येत आहे. हे पोस्टर फ्लोराच्या पोस्टरसोबत तंतोतंत जुळणारं आहे. त्यामुळे ‘जजमेंटल है क्या’चं पोस्टर चोरल्याचं फ्लोराने म्हटलं आहे.

फ्लोराने ट्विटवर कंगनाचं आणि तिचं सारखं दिसणारं पोस्टर शेअर केलं आहे. सोबतच चित्रपटाची निर्माती एकता कपूर आणि तिच्या प्रोडक्शन हाऊसला टॅग केलं आहे. ‘या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये माझ्या कलेची चोरी केली आहे. कोणी मला सांगेल का नक्की काय होतयं हे ? हे अजिबात योग्य नाही’, असं फ्लोराने फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, फ्लोराने राजकुमार रावने शेअर केलेला फोटोदेखील रिट्विट केला आहे. ‘ओह, हा.. हा फोटो पाहून मला काही तरी आठवलं..थांबा..असं वाटतंय की हे मी केलेलीच कलाकृती आहे’, अशी कमेंट फ्लोराने राजकुमारची पोस्ट रिट्विट करत म्हटलं आहे.