बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. ‘इश्क’, ‘येस बॉस’,’दिवाना मस्ताना’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी जुही ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. त्यामुळे तिच्यासोबत लग्न व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा होती. बॉलिवूडमधील करिअर शिखरावर असताना तिने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. पण तुम्हाला माहितीये का बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने अवघ्या ६ वर्षाचा असताना तिला प्रपोज केला होता. तिने स्वत: याबाबतचा खुलासा केला होता.
जुही चावला ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने ६ वर्षाचा असताना तिला प्रपोज केला होता. अनेक वर्षांनंतर तिने स्वत: याबाबतचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला होता.
अभिनेता आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खानने नुकतंच त्याचा वाढदिवस साजरा केला. अभिनेता इमरान खानच्या वाढदिवसानिमित्त जुही चावलाने त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी तिने त्याचा एक सुंदर किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा शेअर करतेवेळी तिने त्याचा एक सुंदर कोलाज फोटो पोस्ट केला आहे.
“इमरानने वयाच्या ६ व्या वर्षी मला प्रपोज केले होते. तेव्हापासून त्याला खरा हिऱ्याची ओळखण्याची समज आहे. माझ्या आतापर्यंतच्या सर्वात लहान आणि तरुण बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे ती म्हणाली.
“त्या मुलाला मी…”, सुष्मिता सेनने मुलगा दत्तक घेतल्याच्या चर्चांवर दिले स्पष्टीकरण
दरम्यान इमरान खानने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘जो जीता वही सिकंदर’ मध्येही त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. इमरान खानने जेनेलिया देशमुखसोबत ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. नंतर त्याने ‘लक’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘दिल्ली बेली’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘एक मैं और एक तू’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. इमरान शेवटचा ‘कट्टी बट्टी’ चित्रपटामध्ये कंगना रनौतसोबत दिसला होता.