मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच ‘स्टार प्रवाह’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘ठरलं तर मग’. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत स्टार प्रवाहने प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्रं भेटीला येतील. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असेल. स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून कल्याणीच्या रूपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. या नव्या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली,‘‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होतो आहे. माहेरी आल्याची भावना आहे. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील याची खात्री आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. अनाथ असली तरी नात्यांचं महत्त्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते की इतक्या छान मालिकेचा मला भाग होता आलं.’’
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ५ डिसेंबरपासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर ‘ठरलं तर मग’.