सुप्रसिद्ध कवी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे जीवनचरित्र पडद्यावर साकारण्याची योजना असून आपल्या आजोबांची भूमिका अभिषेक बच्चन करणार आहे.
गेल्या काही काळात रिमेक आणि सीक्वेल चित्रपटांबरोबरच चरित्रपट साकारण्याकडे बॉलीवूडचा कल वाढताना दिसतोय. काल्पनिक गोष्टींमधील नाटय़ आाणि रोमॅण्टिक कॉमेडीचा अतिरेक झाल्यानंतर वास्तविक आयुष्यातील व्यक्तींचा संघर्ष आणि त्यातील नाटय़च प्रेक्षकांना अधिक भावतय, असा एक मतप्रवाह बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शकांमध्ये सध्या दिसत आहे. त्यामुळेच अभिनेते-अभिनेत्रींचा कलही चरित्रपटांकडे वाढत आहे.
आतापर्यंत मराठीमध्ये ऐतिहासिक विषय तसेच ‘मी सिंधुताई सपकाळ’ यांसारख्या चरित्रपटांद्वारे व्यक्तिमत्व आणि त्यांची महत्ता चित्रपटाद्वारे यशस्वीरित्या मांडण्यात आली. त्यानंतर ‘द डर्टी पिक्चर’मधून विद्या बालनने गतकाळातील दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा समर्थपणे पडद्यावर साकारली होती. चरित्रपटांमध्ये अलिकडच्या काळात सर्वाधिक प्रभावी ठरलेले चित्रपट म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘पानसिंग तोमर’. या चित्रपटांच्या गल्लापेटीवरील यशामुळे आणि व्यक्तींचे जीवनचरित्र नेमकेपणाने साकारल्यामुळे बॉलीवूडला चरित्रपटांचे वेध लागले असावेत, असा अंदाज आहे.
‘गुरू’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटातून धीरूभाई अंबानी यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारी अशी गुरूकान्त देसाई ही व्यक्तिरेखा अभिषेक बच्चनने यशस्वीरित्या साकारली होती. आता अभिषेक हा थेट आपले आजोबा प्रख्यात हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची भूमिका पडद्यावर साकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चरित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणे आपल्याला आवडते. विशेष म्हणजे आपले आजोबा आणि कवी हरिवंशराय बच्चन यांची व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान ठरणार आहे. त्यांच्यावरील चरित्रपटाची निर्मिती आपणच करणार असल्याचे सूतोवाच अभिषेकने केले आहे.
माझे आजोबा कवी हरिवंशराय बच्चन यांचीच व्यक्तिरेखा साकारायची असली आणि माझ्या घरीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दाखविणारे साहित्य उपलब्ध असले तरीसुद्धा हे मोठेच आव्हान ठरणार असून आणखी मोठय़ा प्रमाणावर संशोधन करायचे ठरवल्याचे अभिषेक म्हणतो.
अभिषेक, हरिवंशराय बच्चन
सुप्रसिद्ध कवी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे जीवनचरित्र पडद्यावर साकारण्याची योजना असून आपल्या आजोबांची भूमिका
![अभिषेक, हरिवंशराय बच्चन](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/12/mv0271.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 25-12-2013 at 08:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior bachchan to produce biopic on grandpa harivansh rai bachchan