ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्या ‘देवरा पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. २७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या पॅन-इंडिया चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच कोटींची उड्डाणे घेतली आहेत. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता ज्युनियर एनटीआर (Junior Ntr), जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर अभिनेता प्रकाश राज आणि झरीना वहाब यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा…“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”

बॉक्स ऑफिस रिपोर्ट

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जागतिक पातळीवर आणि भारतात मिळून ४०५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, या चित्रपटाने भारतात पहिल्या सात दिवसांत २१५.६० कोटी रुपये कमावले आहेत आणि जागतिक पातळीवर ३२५ कोटी रुपये मिळवले आहेत. आठव्या दिवशी, चित्रपटाने अंदाजे १.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ज्युनियर एनटीआरचा सोलो कमबॅक

‘देवरा’ हा ज्युनियर एनटीआरचा सहा वर्षांनंतरचा पहिला सोलो चित्रपट आहे. यापूर्वी तो एस.एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात राम चरणबरोबर दिसला होता. काही दिवसांपूर्वी ज्युनियर एनटीआरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. त्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “मी ज्या दिवसाची वाट पाहत होतो, तो अखेर आला आहे… तुमच्या अद्वितीय प्रतिक्रियांमुळे भारावून गेलो आहे. माझ्या चाहत्यांनो, ‘देवरा’साठी तुमचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला आहे. तुमच्या प्रेमासाठी सदैव ऋणी राहीन. तुम्ही चित्रपटाचा जितका आनंद घेत आहात, तितकाच आनंद मला मिळाला. तुम्हाला असेच मनोरंजन करत राहण्याचे वचन देतो.”

हेही वाचा…मराठमोळी शर्वरी वाघ अन् आलिया भट्टच्या ‘अल्फा’ची रिलीज डेट ठरली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

‘देवरा पार्ट १’ चित्रपटाबद्दल

या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत आहे, तर सैफ अली खान, जान्हवी कपूर, प्रकाश राज, श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको आणि नारायण यांच्या महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ज्युनियर एनटीआरचे समुद्रातील आणि जमिनीवरील फायटिंग सीन्स जबरदस्त आहेत. अभिनेता सैफ अली खानने या सिनेमात निर्दयी खलनायकाची भूमिका बजावली आहे. सिनेमात प्रचंड रक्तपात आणि जबरदस्त फायटिंग सीन आहेत. सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआरच्या दमदार अ‍ॅक्शन फ्रेम्स या सिनेमात आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी त्याचा पहिला दिवस अत्यंत यशस्वी ठरला आणि या सिनेमाने पहिल्या दिवशी १७२ कोटी रुपयांची कमाई केली.