एकीकडे मराठी चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकांवर मोहोर उमटवत असताना हिंदीप्रमाणेच मराठीत फक्त आणि फक्त बिनडोक करमणूक करणारे चित्रपट बनविण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. ‘जस्ट गंमत’ हा चित्रपटही करमणूक म्हणून बनविलेला आहे. निव्वळ धमाल करमणूकप्रधान चित्रपट करायलाही हरकत काहीच नसते. परंतु तकलादू कथानक, प्रमुख व्यक्तिरेखांना कोणताही शेंडा-बुडखा नसणे आणि फक्त टाईमपास रंजन म्हणून प्रेक्षकाने चित्रपट पाहावा असा हेतू निर्माता-दिग्दर्शकांनी बाळगला असला तरी या चित्रपटाद्वारे जणू प्रेक्षकांचीच ‘गंमत’ करण्याचा प्रयत्न यात दिसतो.
प्रेमविवाह असो की नसो, नवरा-बायको असे नाते तयार झाल्यानंतर सर्वसामान्यपणे निर्माण होणारे ताणेबाणे, नवपरिणित जोडप्याची नवेपणाची नवलाई संपल्यानंतर नवरा-बायको यांना एकमेकांची ‘खरी’ ओळख होणे, एकमेकांच्या सवयी, उणिवा समजणे आणि त्यामुळे नवरा-बायको यांच्यात होणारी भांडणे, तरीसुद्धा संसार करणे या सगळ्या गोष्टींवर अनेक उत्तम चित्रपट मराठी-हिंदीत येऊन गेले आहेत. परंतु ‘हटके’ बनविण्याच्या नादात चित्रपटकर्ते हे सारे विसरले असावेत, अशी शंका यावी अशा पद्धतीची मांडणी या चित्रपटात केली आहे.
संजय नार्वेकर-स्मिता गोंदकर आणि जितेंद्र जोशी-आदिती सारंगधर अशी दोन दाम्पत्ये या चित्रपटात आहेत. संजय नार्वेकर-जितेंद्र जोशी हे दोघे पूर्वीपासूनचे जिवलग मित्र. परंतु, बऱ्याच वर्षांनी अचानक एका बारमध्ये त्यांची भेट होते. दोघेही एकमेकांच्या पत्नीविषयी एकमेकांना सांगतात. मद्याच्या नशेत दोघेही एकमेकांच्या बायकांची हत्या करण्याचे ठरवितात. संजय नार्वेकर लगेच जाऊन आपल्या मित्राच्या बायकोची हत्या करतो. जितेंद्र जोशी मात्र आपल्या मित्राच्या बायकोची हत्या करायला जातो आणि निराळ्याच प्रसंगाला त्याला सामोरे जावे लागते. गैरसमज, त्यातून उद्भवणारे विनोद, त्यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही rv14नायक निरनिराळे उपाय करून पाहतात आणि त्यात स्वत:च फसत जातात. एकमेकांच्या पत्नींची हत्या करण्याच्या योजनेचे मूळ कथानक आणि त्याला एका हिऱ्यांचा हार गमावल्याचे जोड कथानक लेखक-दिग्दर्शकाने मिसळले आहे. त्यामुळे चित्रपट आणखी मसालेदार की काय होईल असे चित्रपटकर्त्यांना वाटत असावे. परंतु कथानक आणि उपकथानकाची जोड देऊनही चित्रपट निव्वळ हास्यास्पद ठरतो. कुठेही प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्याची शक्यता चित्रपटात नाही. संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी यांच्यासारख्या कलावंतांना घेऊनही त्यांच्या अभिनयकौशल्याचा चांगला उपयोग चित्रपटकर्त्यांना करून घेता आलेला नाही.
अश्रवणीय गाण्यांचा भडिमार ही या चित्रपटातील आणखी एक तकलादू बाजू म्हणता येईल. स्मिता गोंदकर या अभिनेत्रीला आदिती सारंगधरच्या तुलनेत अधिक काळ पडद्यावर वावरण्याची संधी मिळाली आहे. स्मिता गोंदकर आपल्या भूमिकेत चमकून दिसली आहे. मात्र प्रमुख चारही व्यक्तिरेखांचे लेखन करताना त्या प्रेक्षकांच्या मनावर ठसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या छटा, व्यक्तिरेखांना व्यक्तिमत्त्व देण्याचा कोणताच प्रयत्न केलेला दिसत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिल्व्हर स्क्रीन एण्टरटेन्मेंट प्रस्तुत
जस्ट गंमत
निर्माता – शरदकुमार श्रीवास्तव
लेखक-दिग्दर्शक – मिलिंद कवडे
संवादलेखक – प्रकाश भागवत
संकलक – विजय खोचीकर
संगीतकार – नितीनकुमार गुप्ता
कलावंत – जितेंद्र जोशी, संजय नार्वेकर, स्मिता गोंदकर, आदिती सारंगधर, अरुण कदम, संजय कुलकर्णी, विजय पाटकर, अतुल तोडणकर, दीपक शिर्के, आरती सोलंकी, आनंदा कारेकर, जयराज नायकर, दीपज्योती नाईक, नयन जाधव, जयवंत वाडकर.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just gammat movie review