हल्ली बॉलीवूडमध्ये एक चित्रपट केला आणि त्यानिमित्ताने एकदा प्रकाशझोतात आलात की मग तुम्ही लगेच ‘स्टार’ वगैरे बनता असा मोठा गैरसमज नवोदित कलावंतांमध्ये पसरलेला दिसतो. मग पहिलाच चित्रपट चालला तर विचारायलाच नको. मग भरमसाट टीव्ही कार्यक्रमांमध्ये झळकणे, जाहिरात मॉडेलिंग, एखाद्या दुकानाचे उद्घाटन करणे वगैरे प्रकाशझोतात राहण्यासाठीचे सगळे मार्ग अवलंबिले जातात. येनकेनप्रकारेण सतत लोकांसमोर दिसत राहणे एवढेच काम उरते. मग भले पहिल्या चित्रपटानंतर चित्रपट मिळो अथवा न मिळो. प्राची देसाईचे असेच झाले असावे. आता तुम्ही विचाराल ही प्राची देसाई कोण.. तुमचा प्रश्न बरोबर आहे. ‘रॉक ऑन’ या २००८ साली आलेल्या चित्रपटात फरहान अख्तरच्या बायकोची भूमिका करणारी.. झी टीव्हीवरील ‘कसम से’ या मालिकेतील अभिनेत्री.. आत्ता आले लक्षात ना.. हा तर ती सध्या कोणता चित्रपट करतेय, तिचा आणि अभिनयाचा संबंध उरला आहे का वगैरे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. परंतु, सेलिब्रिटी नावाच्या व्यक्तीला चित्रपट असला आणि बरी भूमिका असली तरच चर्चेत राहता येते असे नाही. तर चर्चेत राहण्यासाठी काही तरी कुठल्या तरी कार्यक्रमात बडबडले की झाले काम.
तर प्राची देसाई म्हणतेय की, सध्या स्त्रीकेंद्री भूमिका असलेले चित्रपट करण्यासाठी खूप संधी आणि वाव असून ही अभिनेत्रींसाठी खूप आनंदाची बाब आहे. अभिनेत्रींसाठी बॉलीवूडमध्ये सध्या चांगले दिवस आहेत. आजकाल अभिनेत्रींना चित्रपट कोणता आहे, कोण कोण निर्माते-दिग्दर्शक आहेत. टीम कशी आहे याचा विचार करण्याची फारशी गरज नाही. उलट अभिनेत्रींना आवडेल अशी भूमिका असली की बाकी काही बघण्याची गरजच नाही. आपल्याला आवडणारी भूमिका मनापासून करण्याची संधी मिळतेय की नाही एवढेच फक्त पाहावे लागते. यापूर्वीच्या काळात सिनेमा कोणता, विषय काय, दिग्दर्शक-सहकलावंत कोण आहेत आणि तुम्हाला दिलेली भूमिका नेमकी पडद्यावर कशी दिसणार आहे, हे सगळे पाहावे लागायचे. परंतु, सध्याचा काळ अभिनेत्रींसाठी फारच चांगला आहे, असे प्राची देसाईने एका उत्पादनाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांना सांगितले. आता प्राची देसाईचे म्हणणे खरे मानले तर मग दस्तुरखुद्द प्राचीचे आगामी काळात कोणते स्त्रीकेंद्री व्यक्तिरेखा असलेले चित्रपट येतायत हेही तिने सांगायला हवे होते ना. पण बहुधा चर्चेत राहण्यासाठी आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळेल म्हणून काहीबाही बडबडायचे असे तिने ठरविले असावे. कारण प्राची देसाईचा आगामी सिनेमा निदान २०१४ मध्ये तरी कोणता येणार आहे याबाबत कुणालाच काही माहीत नाही. आणि तिने आतापर्यंत रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका या साध्या सहनायिकेला मिळतात तेवढय़ा लांबीच्या आणि कथानकानुसार बिनमहत्त्वाच्या होत्या. त्यामुळे अभिनेत्रींनी आवडतील त्या भूमिका करण्याचा काळ बॉलीवूडमध्ये आहे या तिच्या म्हणण्याला काही अर्थ नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा