कार्टून कॉमिक्समधून गाजलेल्या व्यक्तिरेखा, जबरदस्त अॅक्शन सीन आणि थ्रीडी अॅनिमेशन यांच्या जोरावर ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘स्पाइडरमॅन’, ‘आयर्नमॅन’ यांसारख्या अनेक सुपरहिरो चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पण प्रेक्षकांची मने जिंकायची तर गोष्ट पुढे नेण्याची गरज होती. ‘माव्र्हल’ने आपल्या सगळ्या लोकप्रिय सुपरहिरोजना एकत्र आणत पहिल्यांदा ‘अॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिका केली. तीही लोकप्रिय झाल्यानंतर त्यांनी ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ ही नवीन संकल्पना विकसित केली आहे. माव्र्हलला टक्कर देण्यासाठी आता ‘डीसी कॉमिक्स’ही मैदानात उतरले आहे. त्यांनीही ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ अंतर्गत ‘जस्टिस लीग’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जॅक सिंडर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या पटकथेचे लिखाण क्रीस टेरिओ यांनी केले आहे. यात बॅटमॅन आणि वंडरवूमनची टीम एकत्र येऊन पृथ्वीला वाचवण्यासाठी एलियन फौजेशी युद्ध करणार आहे. चित्रपटात बेन अॅफ्लेक, हेन्री कॅविल, गॅल गॅदॉत, जेसन मोमा, रे फिशर आणि एमी अॅडम्स या कलाकारांनी सुपरहिरोंच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ने आजवर ‘जस्टिस लीग वॉर’, ‘सन ऑफ बॅटमॅन’, ‘बॅटमॅन: बॅड ब्लड’, ‘वंडर वूमन’, ‘सुपरमॅन वॉर’ यांसारख्या तीसहून अधिक सुपरहिट कार्टूनपटांची निर्मिती केली आहे. परंतु, जे यश त्यांना कार्टूनपटांतून मिळाले ते चित्रपटांतून मिळाले नाही. ‘सुपरमॅन: मॅन ऑफ स्टील’ वगळता गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले ‘बॅटमॅन वस्रेस सुपरमॅन: डॉन ऑफ जस्टिस’ आणि ‘सुसाइड स्क्वॉड’हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकले नाहीत. एकीकडे माव्र्हलने निर्माण केलेले ‘स्पाइडरमॅन’, ‘आयर्नमॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘थॉर’, ‘हल्क’ हे सुपरहिरो लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी गाठत असताना ‘डीसी एक्स्टेंडेड’ने निर्माण केलेले ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’ हे सुपरहिरो काहीसे कालबाह्य़ ठरत आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘जस्टिस लीग’ या चित्रपटाकडून डीसीलाही खूप अपेक्षा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा