Justin Bieber Hailey Bieber welcomes first baby: लोकप्रिय पॉप गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) बाबा झाला आहे. त्याची पत्नी हेली बीबर हिने बाळाला जन्म दिला आहे. जस्टिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. जस्टिन व हेली लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले आहेत. त्याने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
जस्टिन बीबर आणि हेली बीबरच्या घरी नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. दोघेही एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत. शनिवारी सकाळी जस्टिन बीबर आणि हेली बीबर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आनंदाची बातमी दिली. या जोडप्याने मुलाचे नावही जाहीर केले आहे.
जस्टिन बीबरने बाळाच्या पायांचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याच्या जन्माची बातमी दिली. “वेलकम होम” (घरी स्वागत आहे) असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. तसेच जस्टिनने मुलाचं नावही जाहीर केलं आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये आपल्या मुलाचे नाव जॅक ब्लूज बीबर आहे, अशी माहिती दिली. जस्टिनची ही पोस्ट हेलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
३० वर्षीय जस्टिन आणि हेली बीबर यांनी यावर्षी मे महिन्यात एका रोमँटिक व्हिडीओ शेअर करून ते आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. या व्हिडीओत ते त्यांच्या लग्नाचे वचन पुन्हा एकदा घेताना दिसले होते. आता दोघेही एका गोंडस मुलाचे पालक झाले आहेत.
हेली व जस्टिन यांची भेट २००६ मध्ये झाली होती. तेव्हा जस्टिन सेलेना गोमेझला डेट करत होता. सेलेनाशी ब्रेकअप झाल्यानंतर जस्टिनने हेलीला डेट करायला सुरुवात केली. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. मग २०१६ मध्ये पुन्हा ते एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर दोन वर्षांनी २०१८ मध्ये हेली व जस्टिन यांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केलं. त्यानंतर वर्षभराने त्यांनी जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केलं होतं. लग्नानंतर सहा वर्षांनी ते आई-बाबा झाले आहेत.