मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या महेश मांजरेकर यांना सध्या एक विचित्र बाधा झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी ही बाधा हिंदी दूरचित्रवाणीवरील अनभिषिक्त सम्राज्ञी असलेल्या एकता कपूरलाही झाली होती. पण गंमत म्हणजे ही बाधा झाल्यानंतर एकताचा मोठा फायदा झाला होता. ही बाधा आहे ‘क’ची! मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर मिळवून देण्याच्या ध्यासापोटी दिवसरात्र एक करणाऱ्या महेशजींना आता या ‘क’ने झपाटल्याने त्यांचाही फायदाच होईल, अशी चिन्हे आहेत.
महेश मांजरेकर यांना सुमारे दीड वर्षांपूर्वी या बाधेने झपाटले. मात्र त्या वेळी त्यांना ही बाधा झाली आहे, हे कोणाच्याच लक्षात आले नाही. ‘काकस्पर्श’चे यश पाहून अनेकांना मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आल्याच्या उकळ्या फुटल्या होत्या. मांजरेकर यांचा पुढील चित्रपट होता ‘कुटुंब’! या चित्रपटाच्या नावाची सुरुवातही ‘क’पासूनच होती. या ‘कुटुंबा’ला मराठी प्रेक्षकांनी काही फार आपलेसे केले नाही. तरीही मांजरेकर यांनी ‘क’ची साथ सोडली नाही.
महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘कोकणस्थ’ही त्याच माळेतील चित्रपट आहे. ‘कोकणस्थ’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद कितपत मिळाला, हे अजूनही स्पष्ट झाले नसले, तरीही जाहिरातींमध्ये मात्र हा चित्रपट ‘प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरू’ असल्याचे चित्र आहे. मांजरेकर यांची ही बाधा एवढी वाढली आहे की, मराठी मनोरंजनसृष्टीला सातासमुद्रापार नेणाऱ्या ‘मिफ्ता’ या पुरस्कार सोहळ्याचे नामकरणही त्यांनी ‘मिक्ता’ असे करून त्यातही ‘क’चा समावेश केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरेकर यांना आपल्या पहिल्यावहिल्या मालिकेचे नावही ‘क’वरूनच ठेवायचे होते. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. यात तथ्य असल्याचे महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करणाऱ्या एका बडय़ा दिग्दर्शकानेही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
महेश मांजरेकर यांना ‘क’ची बाधा
मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या महेश मांजरेकर यांना सध्या एक विचित्र बाधा झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी ही बाधा हिंदी दूरचित्रवाणीवरील अनभिषिक्त सम्राज्ञी असलेल्या एकता कपूरलाही झाली होती. पण गंमत म्हणजे ही बाधा झाल्यानंतर एकताचा मोठा फायदा झाला होता. ही बाधा आहे ‘क’ची!
First published on: 02-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K factor in mahesh manjrekar life