‘हँपी लकी एंटरटेनमेंट’ या संस्थेतर्फे शनिवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ‘के फाँर किशोर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तब्बल ६२ वादकांच्या साथीने होणाऱ्या या कार्यक्रमात किशोरदांची गाणी त्यांचे वारसदार अमितकुमार व सुमीतकुमार सादर करणार आहेत. मुंबईत प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने या दोघांनी खास ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
बाबांना जाऊन १३ आँक्टोबरला २६ वष्रे झाली, तरी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यांच्या नावाने एवढा मोठा कार्यक्रम होतोय, तोही मुंबईतील सर्वात मोठय़ा सभागृहात, यातच सगळं आलं. त्यांची गाणी ऐकायला खूप छान व सोपी वाटतात, मात्र ती गाताना कळतं बाबा किती ग्रेट होते ते. बाबांसह केलेले देश-विदेशातील दौरे या शोच्या निमित्ताने मला आठवतायत. नकळतपणे किती शिकवलं त्यांनी मला, गाण्यात श्वास कुठे घ्यायचा, कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा, उच्चार स्पष्टपणे कसे करायचे.. मुलगा या नात्याने त्यांना खूप जवळून अनुभवता आलं, हे माझं भाग्य.
आज मी माझ्या कारकीर्दीचा जेव्हा विचार करतो तेव्हा बाबा आणि पंचमदा यांची मला खूप आठवण येते. मला घडवण्यात या दोघांचं खूप मोठं योगदान आहे. ‘बडे अच्छे लगते है’ या पंचमदांच्या गाण्यामुळे मला गायक म्हणून ओळख मिळाली, त्यानंतर त्यांच्याच ‘याद आ रही है’ या गाण्यासाठी मला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मला बाबांच्याच हस्ते षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात देण्यात आला होता. बाबा गेल्यानंतर त्यांची जागा मी घेईन असं अनेकांना वाटलं होतं. मात्र तोपर्यंत चित्रपटसृष्टीत बराच बदल झाला होता. त्या गळेकापू स्पध्रेत केवळ गुणवत्ता पुरेशी नव्हती. अनेक तडजोडी कराव्या लागत. त्या मी केल्या नाहीत. कालांतराने गाण्यांचा दर्जाही खूप घसरत गेला. त्यामुळे मी त्यात रमलो नाही. पंचमदांचं कोणतंही गाणं ऐका आणि आजची गाणी ऐका, त्यांच्या तोडीचं एक तरी गाणं आजकाल होतं का.. त्यामुळे संजय महालेंसारखे आमचे मित्र ‘के फॉर किशोर’सारखे कार्यक्रम आयोजित करतात. त्यात मी आनंदाने सहभागी होतो.
‘के फॉर किशोर’ची मी खूप उत्सुकतेने वाट बघतोय. मी आणि अमितदा बाबांची गाणी गाणार ही कल्पनाच किती छान आहे. या कार्यक्रमाची तयारी करताना त्यांची खूप आठवण येते. बाबा गेले तेव्हा मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. जसा मोठा होत गेलो तसं कळत गेलं की ते किती ग्रेट आणि अष्टपलू होते. त्यांचा सहवास आणखी किमान १० वष्रे मिळाला असता तर किती चांगलं झालं असतं, असा विचार नेहमी माझ्या मनात येतो. हा कार्यक्रम म्हणजे आमच्याकडून त्यांना श्रद्धांजलीच असेल.

Story img Loader