संसारात पती-पत्नीला अनेक गोष्टींमध्ये तडजोडी कराव्या लागतात यातील काही तडजोडी स्वेच्छेने केलेल्या असतात तर काही अनिच्छेने. अशा तडजोडीमुळे अनेकदा नात्यामध्ये कटुपणा सुद्धा येतो. पण काही तडजोडी केल्यानंतरही संसारातील गोडवा टिकुन राहत असेल आणि दिवसागणीक प्रेम वाढतच असेल तर ती तडजोड पण गोडच वाटते. अशाच तडजोडीची आणि प्रेमाची कथा आहे नव्याने येत असलेल्या ‘का रे दुरावा’ या मालिकेची. फिल्म फार्मची निर्मिती असलेली ही मालिका आजपासून दर सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सुयश टिळक, सुरूची अडारकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत राजन भिसे, अरुण नलावडे, सुनील तावडे, विशाखा सुभेदार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध सिनेअभिनेता सुबोध भावेही एका खास भूमिकेत दिसणार असून ब-याच कालावधीनंतर त्याचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे.
‘का रे दुरावा’ची कथा आहे जय आणि अदितीची. मुंबईतील गिरगावच्या चाळीत राहणारं हे मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडपं. घरात आई, वडील, भाऊ वहिनी आणि लाडक्या चिनूसोबत राहणा-या जय आणि आदितीच्या आयुष्यात काही पेचप्रसंग निर्माण होतात ज्यामुळे त्यांना आपलं राहतं घर सोडावं लागतं. कुटुंबापासून तुटल्यावर दोघांच्याही जीवनाचा एक नवा संघर्ष सुरू होतो. पण दोघांचही एकमेकांवर मनापासून प्रेम असल्यामुळे या तडजोडीच्या संसारातही ते कायम सुखाचा शोध घेत असतात. रोजच्या जगण्यातल्या या तडजोडींशी जुळवुन घेत असतानाच त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडते जिथे त्यांचं पती – पत्नीचं नातंच एक तडजोड बनते. मनामध्ये एकमेकांविषयी अपार प्रेम असलं तरी सर्वांसमोर मात्र ते व्यक्त न करता दुरावा राखण्याची वेळ दोघांवरही येते. पण असं म्हणतात की जिथे दुरावा येतो तिथुन प्रेम नव्याने सुरू होतं. आणि दुराव्यातील त्या प्रेमाचीच ही गोष्ट आहे.या मालिकेत जयच्या मुख्य भूमिकेत सुयश टिळक तर अदितीच्या भूमिकेत सुरूची अडारकर दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुबोध जवळपास ६ वर्षांनतर छोट्या पडद्याकडे वळला आहे.
प्रेमातील दुराव्याची आणि दुराव्यातील प्रेमाची एक आगळी वेगळी गोष्ट सांगणारी ‘का रे दुरावा’ ही मालिका आजपासून रात्री ९ वा. झी मराठी वाहिनीवर पाहण्यास मिळेल..

Story img Loader