सध्या लीना मणिमेकल याचा माहितीपट ‘काली’च्या पोस्टवरमुळे सुरू झालेल्या वादाची देशभरात चर्चा सुरू आहे. एकीकडे लीना मणीमेकल यांच्यावर या पोस्टमुळे टीका होत आहे तर दुसरीकडे देशभरातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर हा वाद सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनुपम खेर यांच्या या ट्वीटचा संदर्भ आता लीना मणीमेकल यांच्या ‘काली’ माहितीपटाशी जोडला जात आहे.
अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर कालीमातेचा फोटो शेअर करताना लिहिलं, “शिमला येथे एक प्रसिद्ध काली मातेचं मंदिर आहे. #कालीबाडी. मी लहान असताना तिथे जात असे. तिथे बुंदीचा प्रसाद आणि गोड चरणामृत दिलं जायचं. मंदिराच्या बाहेर एक साधूबाबा बसलेले असायचे आणि ते सतत ‘जय मां कलकत्ते वाली। तेरा श्राप ना जाये खाली..’ ही ओळ म्हणत राहायचे. आज ते मंदिर आणि त्या साधूबाबांची आठवण येतेय.”
अनुपम खेर यांच्या या ट्वीटवर चाहत्यांनी खूपच धम्माल कमेंट केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, “घाबरू नका. ते साधू बाबा आज असतील किंवा नसतील पण काली मातेचा क्रोध आजही तसाच आहे आणि भविष्यातही तसाच राहिल.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “पापी लोकांना त्यांच्या कर्मांची शिक्षा मिळणार. फक्त थोडा वेळ लागेल.” याशिवाय काही चाहत्यांनी कमेंट करत अनुपम खेर यांनी स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं आहे.
दरम्यान भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या माहितीपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. पण या माहितीपटाच्या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला दावा अनेकजण करत आहे. ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. यावरून अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत टीका केली जात आहे.