हिंदी चित्रपटांच्या यशाची फुटपट्टी मोठी करायला लावणाऱ्या दोन खानांची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून कमीत कमी दिवसांत दोनशे कोटी रुपयांचा पल्ला गाठला. तेव्हा सलमान खान थेट बॉलीवूड कलाकारांमध्ये पहिल्या पंक्तीत जाऊन बसला. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ने पहिल्यांदा दोनशे-तीनशे कोटी रुपयांची कमाई केली असली तरी चित्रपटात आमिर एकटा नव्हता. ‘एक था टायगर’ हा चित्रपट केवळ सलमानचा असल्याने त्याचे कौतुक आगळे ठरले. पण सलमानसारख्या अभिनेत्याबरोबर पहिल्यांदाच काम करत असताना भांडून-तंटून का होईना आपल्याला हवा तसाच चित्रपट करण्याचे श्रेय हे दिग्दर्शक कबीर खानचे होते. त्याअर्थाने तो बॉलीवूडचा दोनशे कोटींचा ‘खान’ दिग्दर्शक ठरला आहे. पहिल्या चित्रपटाच्या वेळी सलमानबरोबर काम करत असताना त्याला समजून घेण्यातच आपले श्रम आणि वेळ खर्ची पडला होता. ‘बजरंगी भाईजान’ हा मात्र खऱ्या अर्थाने आमच्या दोघांचा चित्रपट आहे, असे कबीर खानने सांगितले.
कबीर खानचे नाव पहिल्यांदा लोकांसमोर आले होते ते ‘काबूल एक्स्प्रेस’ या अनोख्या नावाच्या चित्रपटामुळे. यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘काबूल एक्स्प्रेस’ चित्रपटात तालिबानी राजवटीचे अफगाणिस्तानवर झालेले परिणाम, दहशतवादासारखा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला होता. या चित्रपटामुळे बॉलीवूडच्या तथाकथित ‘व्यावसायिक’ चौकटीत राहून असा विषय लोकांपर्यंत पोहोचवणारा दिग्दर्शक म्हणून कबीर खानची लक्षणीय दखल घेतली. ‘काबूल एक्स्प्रेस’ला आंतरराष्ट्रीय राजकीय कथेची पाश्र्वभूमी होती. त्या चित्रपटाला जेव्हा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं तेव्हाच असे चित्रपट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या राजकीय उलाढालींचे पडसाद समाजमनावर किती खोल उमटत असतात हे दाखवणारे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आल्याचं कबीर खानने सांगितलं. ‘काबूल..’नंतर पुन्हा एकदा जॉन अब्राहम, नील मुकेश आणि कतरिना कैफला घेऊन कबीर खानने ‘न्यूयॉर्क’ चित्रपट केला. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर बदललेली समीकरणे, अमेरिके कडून तेथील भारतीयांना विशेषत: मुस्लीम तरुणांना मिळालेली वागणूक आणि त्यामुळे दहशतवादाकडे वळलेली त्यांची पावले हा विषय कबीर खानने मांडला. ‘एक था टायगर’मध्ये भारत-पाकिस्तान, गुप्तहेरांचे आयुष्य अशी वेगळी कथा होती आणि आता ‘बजरंगी भाईजान’ हा त्याहीपुढे जात मानवतेच्या दृष्टिकोनातून दहशतवाद आणि धार्मिक तेढीचा वेध घेणारा चित्रपट असणार आहे. आपल्याकडेच काय जगभरात कुठेही राजकीय, प्रशासकीय माहितीची, विचारांची पाश्र्वभूमी असलेले चित्रपट लोकांना पाहायला आवडतात. पण, म्हणून तुमचा चित्रपट पूर्णत: राजकारणावर असला तर तो प्रेक्षकांना रुचणार नाही. राजकारणाची पाश्र्वभूमी असणं आणि राजकारणावर संपूर्ण चित्रपट बेतणं यात खूप फरक आहे हे मुळात दिग्दर्शकांच्या लक्षात असलं पाहिजे, असं तो सांगतो. शेवटी चित्रपट हे लोकांच्या मनोरंजनासाठीच असतात. त्यामुळे त्यांना गुंतवून ठेवेल, अशी कथा तुमच्याकडे असणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. दिग्दर्शक म्हणून तुम्ही कथेची मांडणी कशी करता हा नंतरचा किंबहुना तुमच्या शैलीचा भाग असतो, असे कबीर खानचे म्हणणे आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, विविध देशांचे देशांतर्गत असलेले ताणेबाणे आणि जगरहाटीवर उमटणारे त्याचे परिणाम हे कबीर खानचे आवडीचे विषय असले तरी चित्रपटाच्या माध्यमातून ते मांडणं सहजसोपं नव्हतं. यासाठी सुरुवातीच्या दिवसांत केलेली मेहनत फळाला आल्याचे कबीरने सांगितले. दिग्दर्शक म्हणून स्थिरावण्याची धडपड करत असताना कबीरने डिस्कव्हरी वाहिनीसाठी ‘द फरगॉटन आर्मी’सारखे माहितीपट केले होते. त्या वेळी डिस्कव्हरीसारख्या वाहिनीबरोबर काम करताना आंतरराष्ट्रीय समस्यांचा जवळून अभ्यास करण्याची आणि प्रत्यक्षात वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन चित्रीकरण करण्याचा जो अनुभव गाठीशी जमा झाला होता त्यातूनच आता असे विषय हिंदी चित्रपटातू मांडणे शक्य झाल्याचे कबीरला वाटते. पण सलमान खान, जॉन अब्राहमसारख्या पूर्णपणे व्यावसायिक मसाला चित्रपटांच्या जिवावर मोठय़ा झालेल्या कलाकारांकडून अशा संवेदनशील विषयांवरचे चित्रपट करून घेणं हे आव्हान नव्हतं का? या प्रश्नावर एक मिश्कील हसू कबीर खानच्या चेहऱ्यावर असतं.
यावर्षी ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याची पाश्र्वभूमी असलेला ‘फँटम’ हा कबीरचा दुसरा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. मी कधीच इतक्या घाईत चित्रपट करत नाही, असं कबीर सांगतो. ‘एक था टायगर’ चित्रपट पूर्ण केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांची सुट्टी त्याने घेतली होती. त्या सुट्टीच्या काळात ‘फँ टम’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन्ही चित्रपटांच्या कथाकल्पनांना आकार देण्याचं काम केलं. सुट्टीनंतर खरं तर त्याने कतरिना कै फ आणि सैफ अली खानबरोबर ‘फँ टम’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. मात्र सलमानने त्यादरम्यान, ‘बजरंगी भाईजान’ची कथा ऐकली आणि हा चित्रपट करायचाच असा आग्रह धरल्याचं कबीरने सांगितलं. मग, त्याला हाच चित्रपट ईदला प्रदर्शित करायचा असल्याने सगळं लक्ष ‘बजरंगी..’वर केंद्रित केलं होतं. आता केवळ सहा आठवडय़ांच्या फरकाने हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे याची माहिती देताना पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, असंही कबीर खान निक्षून सांगतो. दहशतवादाचा वेगवेगळ्या बाजूने विचार करणारा आणि चित्रपटातून ते मांडणारा कबीर खान ‘रोम-कॉम’कडे कधीच वळणार नाही का? यावर उलट मी अशा चित्रपटाच्या कथाकल्पनेवर काम करतो आहे, असे उत्तर देत त्याने एक सुखद धक्का दिला आहे. ‘एक था टायगर’सारखाच विक्रम ‘बजरंगी भाईजान’मधून क रणं कबीर आणि सलमान खान जोडीला शक्य होईल का? याबद्दल सध्या इंडस्ट्रीत कमालीची उत्सुकता आहे. मात्र ‘बजरंगी भाईजान’मध्ये मांडलेला विषय प्रेक्षकांना आवडला तर खूप काही साध्य करता येईल, अशी आशा असल्याने कबीर खानच्या मनाच्या प्रयोगशाळेत मात्र, विषयांच्या दृष्टीने नवे प्रयोग सुरू आहेत..

प्रत्येक कलाकाराबरोबर काम करतानाचा अनुभव वेगळा असतो. तीन वर्षांपूर्वी ‘एक था टायगर’ करताना सलमानशी प्रत्येक गोष्टीत वाद झाले होते. त्या वेळी सलमानला समजून घेताना फार वेळ खर्ची पडला होता. ती दोघांचीही पहिली वेळ होती. मात्र चित्रपट संपता संपता आम्हा दोघांनाही एकमेकांच्या विचारांची, कामाच्या पद्धतीची चांगली ओळख झाली होती. शेवटी, तुमचा कलाकार निर्बुद्ध असेल तर त्याच्याबरोबर काम करण्यात मजा नाही. कलाकार स्वत: विचार करून कथेत काही बदल सुचवतो, त्यावर दिग्दर्शक म्हणून तुम्ही तुमचा विचार मांडता; या विचारमंथनातूनच चांगलं असं काही तुमच्या हाती लागतं. त्यामुळे ‘बजरंगी भाईजान’ करताना आमच्या दोघांमध्ये वैचारिक देवाणघेवाणही तितकीच चांगली झाली. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या नावावरूनही वादाचं मोहोळ उमटलं आहे. मात्र चित्रपटाच्या नावातच त्याचं सार सामावलं आहे. चुकून सीमेपलीकडे आलेली एक छोटी मुलगी आणि तिच्या अनुषंगाने भारत-पाकिस्तान या जुन्या वादाची नवी मांडणी आहे एवढचं..
कबीर खान

Story img Loader