प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या संघर्षाचा काळ खूप महत्त्वाचा असतो. हाच काळ त्याला आयुष्यातल्या सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवतो. विनोदी आणि खलनायकी या दोन टोकाच्या बाजू असल्या तरी पडद्यावर दोन्ही भूमिका दमदारपणे साकारणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या कादर खान यांचा संघर्षाचा काळ अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
मी एका गरीब घरातून आलो पण आयुष्यातली पहिली भूमिका मला राजकुमाराची मिळाली असं ते सांगतात. इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच ते नाटकातसुद्धा काम करत होते. नाटकातून पुढे त्यांचा प्रवास चित्रपटांपर्यंत गेला. सुरुवातीला चित्रपटांमध्ये काम करत असताना ते मुंबईच्या एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इंजीनिअरिंग शिकवत होते. त्यादरम्यान ‘लोकल ट्रेन’ या नाटकासाठी त्यांना पुरस्कार आणि बक्षीस म्हणून १५०० रुपये मिळाले होते. त्याचप्रमाणे ‘जवानी दिवानी’ या चित्रपटातील संवादलेखनाची ऑफरसुद्धा तेव्हाच मिळाली. त्याकाळी त्यांचा पगार ३५० रुपये इतका होता.
हा किस्सा कादर खान यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ‘लोकांना माझं संवादलेखन आवडू लागलं होतं. या कामात मी इतका व्यग्र झालो की कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी वेळच मिळत नव्हता. चित्रपटाचं काम रात्री ११ वाजता संपायचं आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला शिकवा असा आग्रह विद्यार्थी करू लागले. त्यांच्या आग्रहाखातर मी दिवसा चित्रपटाचं काम झालं की मध्यरात्री कॉलेजमध्ये शिकवायला जायचो. माझ्यासाठी १५० विद्यार्थी थांबलेले असायचे. हे विद्यार्थी मला चहा करून द्यायचे, डोक्याला बाम लावायचे. त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालं. तीन महिने त्यांना मी शिकवलं आणि सर्व १५० विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. प्रेरणादायी प्रसंग म्हणून ही गोष्ट मला एका चित्रपटाच्या दृश्यात सांगायची होती.’
वाचा : तीन दिवस जेवायचं आणि तीन दिवस भुकेल्या पोटी झोपायचं, कादर खान यांचा संघर्ष
संवादलेखनासाठी मिळालेल्या १५०० रुपयांपासून ते २१ हजार रुपयांचं मिळालेलं ते पाकीट या गोष्टींमुळे कादर खान यांच्या आयुष्यात महत्त्वाचं वळण आलं. ‘जवानी दिवानी चित्रपटासाठी संवादलेखनाचं काम संपलं होतं. असंच एके दिवशी मी रस्त्याने चालत असताना एक कार येऊन माझ्या बाजूला थांबली. कारमधून एक माणूस बाहेर आला आणि माझ्या चित्रपटात काम करणार का असा प्रश्न विचारला. मला विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं असं कारण मी त्यांना दिलं. त्यांनी माझ्या हातात एक पाकिट ठेवलं. ते पाकिट इतकं जड होतं की रस्त्याच्या एका बाजूला जाऊन मला तो खोलावं लागलं. त्यात तब्बल २१ हजार रुपये होते. इतके पैसे पाहून माझे डोळेच विस्फारले गेले,’ असं कादर खान यांनी त्या मुलाखतीत सांगितलं. त्यांच्या हातात पाकिट ठेवणारा व्यक्ती होता रवी मल्होत्रा, ‘खेल खेल मैं’ या चित्रपटाचे निर्माते.
अशा प्रकारे आयुष्याच्या विविध वळणांतून कादर खान यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आज (मंगळवार, १ जानेवारी) त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.