ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये जन्म झालेल्या कादर खान यांचं कुटुंब नंतर भारतात येऊन स्थायिक झालं. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्यांना अत्यंत हालाखीत दिवस काढावे लागले होते. मुंबईतील झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. कादर खान यांच्यासाठी त्यांच्या आईने प्रचंड कष्ट घेतले. आपल्या आईची परिस्थिती आणि घरातली गरिबी पाहून एकदा कादर खान मित्रांसोबत मजुरी करण्यासाठी निघाले होते. पण त्यांच्या आईने शपथ देत फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं आणि त्यानंतर कादर खान यांचं आयुष्यच पालटलं.

कादर खान यांनी एका मुलाखतीत आपल्या आईच्या निधनाबद्दल सांगितलं होतं. कादर खान एका स्पर्धेसाठी बाहेर गेले होते. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं तर आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एका भांड्यात ती उलटी करुन ते सगळं रक्त बाथरुममध्ये ओतून देत होती. हे चित्र पाहून कादर खान प्रचंड घाबरले. त्यांनी आईला विचारलं असता तिने थोडासा त्रास होत असल्याचं सांगितलं. यावर कादर खान तू मला हे आधी का सांगितलं नाहीस विचारत चिडले आणि डॉक्टरला आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण डॉक्टर त्यांच्यासोबत येण्सास तयार होत नव्हता. यावेळी त्यांनी चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे डॉक्टरला खांद्यावर उचलून घेतलं आणि घरी आणलं. घरी आल्यानतंर डॉक्टरने तपासलं तेव्हा त्यांचा आईचा मृत्यू झाला होता.

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

कादर खान यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून आपलं हे दु:ख जाहीर केलं आहे. चित्रपटांसाठी संवाद लेखन करताना जेव्हा कधी आई आणि मुलामधील संवाद असायचा तेव्हा त्यात कादर खान यांचं दु:ख झळकायचं. संघर्षातून उभारी घेतलेला या हुरहुन्नरी अभिनेत्याचं आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कादर खान यांनी 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं.  300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केलं. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. त्यांची लेखणी आणि अभिनय वेगळंच रसायन होतं. त्यांनी लिहिलेल्या संवादातून समाजातील भीषण वास्तव मांडण्याचा ते प्रयत्न करत असत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणारा एक उत्तम अभिनेता म्हणून कादर खान यांना ओळखलं जायचं. करिअरच्या सुरुवातीला व्हिलनचं पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कादर खान यांनी हिंमतवाला चित्रपटापासून कॉमेडी भूमिकांकडे आपलं लक्ष्य केंद्रीत केलं होतं.

Story img Loader