बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांच्या निधनाची अफवा उडाली. सोशल मिडियावर कादर खान यांच्या निधनाची बातमी वा-यासारखी पसरली आणि चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करु लागले. पण अखेर कादर खान यांच्या मुलाने या सर्व वृत्ताचे खंडण केले आहे.
चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती गंभीर आहे. कॅनडातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून कादर खान यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मात्र, कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची आणि अफवा असल्याचे मुलगा सरफराज खान यांनी सांगितले. दरम्यान, कादर खान यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी इच्छा बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
पडद्यावर दमदार अभिनय सादर करणाऱ्या, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ८१ वर्षाय कादर खान यांनी जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. अभिनेता आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांनी चांगलेच नाव कमावले आहे. कादर खान यांच्या नावावर एकेकाळी चित्रपट चालत असत.
कादर खान यांनी ‘डाग’ या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘कुली’, ‘होशियार’, ‘हत्या’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटसृष्टीत आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कादर खान यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच प्रेक्षकांनीही चिंता व्यक्त केली.