दिग्दर्शक मकरंद माने यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘कागर’ हा नव्या दमाचा आणि नव्या धाटणीचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. निवडणुकीची रणधुमाळी,कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार, निवडणुकीचं राजकारण आणि या साऱ्यामध्ये खुलणारं त्या दोघांचं प्रेम. या साऱ्यावर आधारित हा ‘कागर’. ‘कागर’ म्हणजे प्रेमाला फुटलेली नवी पालवी, छोटासा कोंब. परंतु राजकारणामुळे या प्रेमाचा घोटला गेलेला जीव आणि त्यानंतरही खंबीरपणे एखाद्या पक्षाचं ‘तिने’ केलेलं नेतृत्व या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीचा काळ,नवीन युवानेतृत्व हे सारं या चित्रपटामध्ये मांडण्यात दिग्दर्शक मकरंद माने यांना यश आलं आहे. विराईनगर येथे आमदारकी मिळविण्यासाठी एकाच राजकीय पक्षामधील दोन व्यक्तींमध्ये वैर निर्माण झालं असतं. मात्र या दोघांमधील वैराचा फायदा पक्षातील तिसरीच व्यक्ती घेते. प्रभाकर देशमुख अर्थात गुरुजी (शशांक शेंडे) हे भैय्यासाहेबांचे राजकीय गुरु असतात.मात्र आपल्या लेकीने प्रियदर्शनी देशमुख अर्थात राणीने (रिंकू राजगुरू) आमदारकी लढावी असा गुरुजींचा मानस असतो. यासाठी ते युवराजला (शुभंकर तावडे) त्यांचा मोहरा बनवतात. मात्र राणीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि गुरुजींवर स्वत:पेक्षा जास्त विश्वास ठेवणाऱ्या युवराजला त्यांचा डाव कधी समजतच नाही. परिणामी गुरुजींनी रचलेल्या डावामध्ये युवराज फसतो.  मात्र आपल्याच वडीलांनी आपल्या प्रियकराचा मोहरा बनविल्याचं राणीच्या लक्षात येतं आणि त्याच्या पुढे तिचा खऱ्या अर्थाने संघर्ष सुरु होतो. राणी नक्की काय करते आणि युवराजचं काय होतं  हे मात्र तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.

चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत राजकीय रणधुमाळी आणि त्यामध्ये राणी आणि युवराजचं प्रेम रेखाटण्यात आला आहे. तर मध्यंतरानंतर राणीने केलेला संघर्ष दाखविण्यात आला आहे. अस्सल गावरान भाषा, मातीतील गोडवा आणि गावपातळीवर रंगणारं राजकारण या चित्रपटामध्ये उत्तमरित्या रेखाटण्यात आलं आहे. फलटणजवळील गावात या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आल्यामुळे या चित्रपटाची रंगत वाढत आहे. तर या चित्रपटामधील कलाकारांनीही अभिनयामुळे चित्रपटाची रंगत वाढविली आहे. आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये होकार भरणारी आणि मुलीच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी राणीची आई(भारती पाटील), आपल्या मित्राचा विश्वासघात करुन चूक उमगल्यानंतर त्याची माफी मागणारा मित्र (विठ्ठल काळे) यांनी उत्तम भूमिका वठविल्या आहेत. यांच्या वाट्याला जरी भूमिका कमी आल्या असल्या तरी त्यांच्या भूमिका छाप पाडून जातात. त्याप्रमाणेच मिलिंद फाटक,महेश भोसले, उमेश जगताप, शशांक शिंडे,सुहास पळशीकर यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.

कागर या चित्रपटामध्ये काही गाण्यांचाही समावेश करण्यात आला असून योग्य प्रसंगानुरुप या गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शुभंकर तावडे या अभिनेत्याने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं असून त्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. तर रिंकू राजगुरूनेदेखील युवानेत्याची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. प्रसंगांना साजेशी वेशभूषा, उत्तम संगीत यासाऱ्यांची सांगड या चित्रपटामध्ये घालण्यात आली. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये राजकारणावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथेला तीन स्टार दिले तर वावगं ठरणार नाही. तीन स्टार

शर्वरी जोशी

sharvari.joshi@loksatta.com