बालाजी टेलिफिल्मस्च्या एकता कपूरच्या ‘कहाँनी घर घर की’ या मालिकेचे नाव घेतले की डोळ्यांसमोर उभी राहते ती या मालिकेतील गाजलेली ‘ओम’ ही व्यक्तिरेखा आणि ती साकारणारा किरण करमरकर. मराठी मालिकांमधून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केलेला किरण पुढे हिंदी मालिका आणि नाटकात व्यग्र झाला. पण ‘कहाँनी घर घर की’ या मालिकेमुळे मराठमोळ्या किरण करमरकरला ‘ओम’ ही नवी ओळख मिळाली आणि त्याचे नाव देशभरात पोहोचले.
हिंदी मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या किरणने यापूर्वी सहा हिंदी नाटके तसेच शंभरहून अधिक जाहिरातींत काम केले आहे. ‘अलिबाबा और चालीस के चोर’ हे त्याचे सातवे नाटक आहे. मराठीत ‘दिनमान’ या मालिकेद्वारे त्याने दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर मराठीतील पहिली मेगा मालिका ‘दामिनी’ यातही तो होता. पुढे तो हिंदीत गेला. ‘सफर’ ही त्याची पहिली हिंदी मालिका. त्यानंतर त्याने ‘घर एक मंदिर’ ही हिंदी मालिकाही केली. पण त्याला खरी ओळख ‘कहाँनी घर घर की’या मालिकेमुळे मिळाली.
हिंदी मालिकांमध्ये व्यग्र असतानाही किरणने ‘कच्चे लम्हे’, ‘हमसफर’, ‘मेरा नाम जोकर’, ‘कहाँनी मे ट्विस्ट है’, ‘शादी की होम डिलिव्हरी’, ‘बस इतनासा ख्वाब है’ (‘ध्यानीमनी’ या मूळ मराठी नाटकाचे हिंदूी रूपांतर) आदी सहा नाटके केली. किरण करत असलेले आताचे नवे नाटकही मूळचे मराठी आहे. हिंदीत व्यग्र असलेल्या किरणने अलीकडेच ‘ए रेनी डे’, ‘भातुकली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘निष्पाप’, ‘यज्ञ’, ‘आघात’ आदी मराठी चित्रपटही त्याच्या नावावर जमा आहेत.  ‘क्षणोक्षणी’ या चित्रपटासाठी त्याला राज्य शासनाचे विशेष अभिनेता म्हणून पारितोषिकही मिळाले आहे. महोत्सवातून दाखविण्यात आलेला आणि सादर झालेला हा चित्रपट अद्याप सर्वत्र प्रदर्शित झालेला नाही.   
‘अलिबाबा और चालीस के चोर’ या नाटकाविषयी ‘रविवार वृत्तान्त’ला माहिती देताना किरण म्हणाला, ‘‘अलिबाबा आणि चाळिशीतील चोर’ या मूळ मराठी नाटकाचे हिंदी रूपांतर मनोज सिसोदिया यांनी ‘अलिबाबा और चालीस के चोर’ या नावाने केले आहे. अभिनेते मनोज जोशी यांनी नाटकाची निर्मिती केली असून नाटकात मनोज जोशी यांच्यासह मेघना मलिक, विश्वनाथ चॅटर्जी, तपस्या नायक आदी कलाकार आहेत. मी या नाटकात ‘अभिषेक’ ही भूमिका करत आहे. नाटकाचे दिग्दर्शन धीरज पालशेतकर यांनी केले असून नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑगस्ट रोजी ‘एनसीपीए’तील टाटा थिएटर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

Story img Loader