मराठी रंगभूमीवर ‘मर्डर मिस्टरीज्’ किंवा सस्पेन्स थ्रिलर नाटकं अधूनमधून येत असली तरी त्यांतलं रहस्य खिळवून ठेवणारं असतंच असं नाही. कारण ही नाटकं लिहिण्यासाठी कथानकाची गुंतागुंतीची रचना आणि त्यातल्या क्लिष्ट गुन्ह्य़ाची उकल करण्याकरता आणि त्यासंबंधीचे धागेदोरे जुळवून आणण्यासाठी जी कुशाग्र पोलिसी मती लागते, तिचा आपल्या लेखक मंडळींकडे अभाव आढळतो. साहजिकच त्यांचा कल एखादा पाश्चात्य सिनेमा किंवा नाटकावर बेतलेलं रहस्यनाटय़ लिहिण्याकडेच अधिक असतो. मात्र, तिथे ज्या तपशिलांत रहस्यनाटय़ वा रहस्यपटावर काम होतं, तितक्या खोलात आपण जात नाही. त्यांची बरी ‘कॉपी’ करण्यापलीकडे आपली झेप जात नाही. स्वतंत्र रहस्यप्रधान नाटकं आपल्याकडे अपवादात्मकच आढळतात. याचं कारण मराठी रंगभूमीचा ओढा कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न, समस्या मांडण्याकडेच अधिक राहिला आहे. मराठी मनालाही रहस्यकथा फार भावत नसल्यानं असेल; रहस्यनाटय़ंही आपल्याकडे कमीच येतात.
नमनाला हे घडाभर तेल ओतायचं कारण : ‘कलारंग’ या दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सारंग यांच्या संस्थेचं त्यांचे पुत्र राकेश सारंग यांनी नुकतंच पुनरुज्जीवन केलं आहे आणि त्यांची पहिलीच नाटय़निर्मिती.. ‘कहानी में ट्विस्ट’ ही सस्पेन्स थ्रिलर आहे. सुरेश जयरामलिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित या नाटकात ‘खून कसा करायचा?’ या विषयाभोवतीच कथानक रचलेलं आहे.
विक्रम बर्वे हे मराठी रंगभूमीवरील एक ज्येष्ठ अभिनेते. सागर देशमुख या नवोदित लेखकानं आपल्यासाठी रहस्यनाटय़ लिहावं म्हणून ते त्याला आपल्या पनवेलच्या फार्महाऊसवर पाचारण करतात.
विक्रम बर्वे यांच्या एकूण चारित्र्याबद्दल आणि त्यांच्या पैशाच्या हव्यासाबद्दल नाटय़वर्तुळात बऱ्याच वदंता असतात. त्यांच्या दोन पत्नींचे मृत्यू संशयास्पद असतात. त्यांची तिसरी पत्नी लेखिका असते. तिनं मात्र विक्रमशी न पटल्यानं त्यांच्यापासून फारकत घेतलेली असते. आणि सध्या विक्रम बर्वेनी तरुण अभिनेत्री विशाखाशी ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ केलेलं असतं. ती श्रीमंत असते. सुंदर असते. विक्रमच्या पाठबळामुळे  तिच्या करिअरला उठाव मिळणार असतो.
सागर देशमुखनं आपल्यासाठी रहस्यनाटय़ लिहावं म्हणून विक्रम बर्वेनी त्याला एकांतवासातील या फार्महाऊसवर बोलावलेलं असतं खरं; परंतु तिथं त्याचं स्वागत ज्या घटनांनी होतं, त्याने तो हादरून जातो. रहस्यकथेसारख्या भयंकर घटना एकामागोमाग एक तिथं घडतात आणि सागर घाबरून जातो. परंतु विक्रम बर्वेंनी त्याला भयचकित करण्यासाठी त्या योजलेल्या असतात हे कळल्यावर त्याचा जीव भांडय़ात पडतो. अशा प्रकारचं सत्य आणि काल्पनिकतेचं मिश्रण असलेलं कथाबीज त्यानं आपल्याला लिहून द्यावं असं विक्रमचं म्हणणं असतं.  म्हणजे कसं, तर- ‘मला माझ्या चौथ्या बायकोचा खून करायचाय.. तोही कसलाही पुरावा मागे न सोडता!’ असं ते सागरला सांगतात. त्यासाठी सागरने पनवेलच्या या फार्महाऊसची आणि चेंबूरच्या आपल्या फ्लॅटची बारकाईनं पाहणी करावी; जेणेकरून यापैकी कुठल्या ठिकाणी हा खून बिनबोभाटपणे करता येईल, हे त्याला निश्चित करता येईल, असं ते त्याला सांगतात. सागरला समजत नाही, की यांना आपल्याकडून ‘फुलप्रूफ’ रहस्यनाटय़ लिहून हवंय, की आपल्या पत्नीचा- विशाखाचा कोणताही पुरावा मागे न सोडता खून करून तिची संपत्ती त्यांना हडपायची आहे, आणि त्यासाठी त्यांना आपला वापर करायचा आहे?
दरम्यान, विशाखाही तिथं येते. तिला पाहताक्षणीच सागर तिच्यावर मोहित होतो. तीही सागरकडे आकर्षिली जाते. हे अर्थातच विक्रम बर्वेच्या चाणाक्ष नजरेपासून लपून राहत नाही. तरीही ते सागरला नाटकाचं लेखन करण्यासाठी तिथं राहायला सांगून त्याच्या देखभालीची जबाबदारी विशाखावर सोपवतात. आणि स्वत: १५ दिवसांसाठी कोल्हापूरला चित्रपटाच्या शुटिंगसाठी रवाना होतात.
विशाखालाही विक्रम कुणा आश्लेषा नामक स्त्रीच्या प्रेमात पडलाय आणि ती त्यांच्या नव्या नाटकाला पैसा पुरवणार असल्याचं कळलेलं असतं. म्हातारपणाकडे झुकलेल्या विक्रमशी तिनं लग्नाचा करार केलेला असतो तो तिचं अभिनय क्षेत्रातलं करिअर मार्गी लागावं म्हणून! पण विक्रम आपल्याशी केव्हाही गद्दारी करेल, आणि आता तो आश्लेषाबरोबर इश्काचा खेळ करण्यासाठीच कोल्हापूरला गेलाय, हेही तिला माहीत असतंच. सागरच्या रूपात तिला आपल्या वयाचा प्रेमिक सापडतो. शिवाय त्याच्याकरवी विक्रमचा काटा काढता येईल, हाही विचार तिच्या मनात डोकावतो. साहजिकच ती इश्काचं जाळं सागरभोवती टाकते. नटाचा हात धरून पळून गेलेल्या बायकोमुळे एकाकी झालेला सागर तिच्या जाळ्यात अडकतो. अर्थात त्यालाही नटांच्या बायकांना आपल्या जाळ्यात ओढून या गोष्टीचा सूड उगवायचा असतो. विक्रमच्या अपरोक्ष दोघं एकमेकांच्या जवळ येतात..
पण बारा गावचं पाणी प्यायलेल्या विक्रमना हे कळणार नाही? आपल्या अपरोक्ष  दोघांचं काय चाललेलं असणार, हे त्यांना माहीत असतंच. परंतु तरीही ते त्यांना एकांत मिळू देतात..
काय असेल यामागची त्यांची चाल? सागर त्यांना हवं तसं नाटक लिहून देतो? त्यांना अपेक्षित असलेला विशाखाच्या खुनाचा ‘फुलप्रूफ प्लॉट’ तो बनवून देतो? की विशाखाच त्याच्याकरवी विक्रमवर डाव उलटवते? सागर त्यांना खेळवतो की ते सागरला? काय होतं पुढे..? या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकातच मिळवलेली बरी!
लेखक सुरेश जयराम यांनी ‘कहानी में ट्विस्ट’मध्ये फुलप्रूफ खुनाचा प्लॉट असलेलं नाटक लिहून देण्याच्या कथानकात त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या उपकथानकाची सरमिसळ केली आहे. दोन पातळ्यांवर नाटक खेळवण्याचा यामागे त्यांचा हेतू आहे. परंतु तो साफ फसला आहे. कारण विक्रमला आपल्या बायकोचा खून करायचा आहे की रहस्यनाटक लिहून हवंय, हे संदिग्ध ठेवण्यात सुरेश जयराम मुळातच अयशस्वी ठरले आहेत. हे नाटक दोन पातळ्यांवर खेळवणं त्यांना जमलेलं नाही. विक्रमना आपल्या बायकोचा खून करायचाय हे पूर्णपणे माहीत असताना सागर त्यांना ‘फुलप्रूफ मर्डर प्लान’ तयार करून देईल, हेही संभवत नाही. तशात विक्रम आपल्यालाही यात गुंतवायला कमी करणार नाही, हे त्याला पहिल्या धक्कातंत्रातच कळलेलं असतं. अशावेळी तो विक्रमला तसं नाटक लिहून देणंच अशक्य. दुसरी गोष्ट म्हणजे तो विशाखाच्या प्रेमात पडला असल्यानं तिच्या जीवाला धोका निर्माण होईल असं काही तो करेल हे संभवतच नाही. बरं, या नाटकात शेवटाकडे विक्रम आणि विशाखा यांच्याबाबतीत इतक्या कोलांटउडय़ा मारल्या गेल्या आहेत, की नाटक तार्किकतेलाच साफ सोडचिठ्ठी देतं. कुठल्याही रहस्यनाटय़ाची उकल करताना किंवा ते संदिग्ध नोटवर संपवताना त्याला बिनतोड तर्काची जोड आवश्यक असते. इथं त्याबाबतीत आनंदीआनंद दिसतो. असो.
दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी हे नाटक बसवलं आहे. त्यांनीही वेगवान घटनांवरच भर दिला आहे. पात्रं विश्वासार्ह बनविण्याकडे त्यांचं साफ दुर्लक्ष झालं आहे. नाटकात सगळ्यांनाच सगळं काही माहीत असताना रहस्य ते कुठलं उरणार? आणि एक-दुसऱ्याच्या चालींना बळी पडण्यासाठी मुळात कुणीतरी अंधारात तर असायला हवं? धक्कातंत्रासाठी पेरलेले प्रसंग वगळता नाटकात कसलंच रहस्य नाही. त्या प्रसंगांचंही पुढं अति होतं आणि हसू येतं. त्यामुळे नाटकाच्या शेवटाचा कसलाच धक्का बसत नाही. मुळात नाटक दोन पातळ्यांवर खेळवण्याची कल्पनाच नीट राबवली न गेल्यानं यातलं नाटय़च उभं राहू शकलेलं नाही. मग उरतात एकामागोमाग एक वेगानं घडणाऱ्या घटना! त्यात तरी वाहवून जाण्यासाठी पात्रांचं अस्सलपण आणि त्यांचं गुंतलेपण तरी अधोरेखित व्हायला हवं ना? तेही नाही. थोडक्यात, लहान मुलांना बागुलबुवाचं भय घालावं तसं हे नाटक झालंय. ना त्यात रहस्य आहे, ना तर्क! याचं अपश्रेय अर्थात दिग्दर्शकाकडेही जातं. त्यांनी संहितेतल्या त्रुटी व उणिवा लेखकाच्या ध्यानी आणून त्या दुरूस्त करवून घेणं अपेक्षित असतं. किंवा मग आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यानं त्यावर मात करायची असते. इथं यापैकी काहीच घडलेलं नाही. हास्यास्पद म्हणजे विक्रमच्या बायकोचं मुंडकं म्हणून जे दाखवलं गेलं आहे त्यानं सागर हादरत असला तरी प्रेक्षकांना मात्र कसलाच धक्का बसत नाही. नाटकात त्या खुनातील मुंडक्यातून रक्त वगैरे काहीच गळत नाही. बहुधा ते छानपैकी पाण्यानं धुऊन, सुकवून आणलेलं असावं!
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी विक्रमच्या फार्महाऊसमधलं रहस्यमय वातावरण त्याच्या विशिष्ट रचनेतून उत्तमरीत्या साकारलंय. राहुल रानडे यांनी धक्कादायक घटना-प्रसंग पाश्र्वसंगीतातून उठावदार केलेले आहेत. परंतु त्यातून जी भीतीची शिरशिरी प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हायला हवी, तशी ती होत नाही. श्रद्धाकुमार यांची प्रकाशयोजना चोख आहे. संगीता सारंग यांची वेशभूषाही लक्षवेधी आहे.
सगळ्या कलाकारांनी उपलब्ध संहितेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यातल्या फटीही त्यांच्या अभिनयात उतरल्या आहेत. डॉ. गिरीश ओक यांनी विक्रमचं पाताळयंत्रीपण यथायोग्यरीत्या दाखवलं आहे. त्यांनी योजलेली धक्कातंत्रं सुरुवातीला अपेक्षित परिणाम साध्य करतात, परंतु पुढे ती बोथट होतात. सागर देशमुखच्या भूमिकेतले सौरभ गोखले सतत गोंधळलेले वाटतात. त्यांची व्यक्तिरेखाही र्अधकच्ची असल्यानं त्यांचं हे गोंधळलेपण स्वाभाविकच म्हणायला हवं. परंतु तरीही आपली भूमिका किमान विश्वासार्ह होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. विशाखाला फारसा स्कोप नव्हता. हे पात्र धड ‘ना घर का, ना घाट का’ स्वरूपाचं असल्यानं त्यात करण्यासारखंही काही नव्हतं. प्राजक्ता गणपुले यांनी ही भूमिका केलीय.
रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा