बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय देवगण आणि काजोल. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचे नात अधिक मजबूत आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले असले तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगणची प्रेम काहाणी देखील खुप इंटरेस्टींग आहे. आज त्यांच्या लग्नाचा २३वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी..
अजय आणि काजोलची पहिली भेट १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कजोलने तिची लव्हस्टोरी सांगितली होती. ‘मी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार झाले होते आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांना चित्रपटात माझ्यासोबत हिरोची भूमिका कोण साकारणार आहे असे विचारत होते. कोणीतरी अजयकडे इशारा केला. तो एका कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले’ असे कजोल म्हणाली.
आणखी वाचा : १०० कोटींचा बंगला ते महागडी वॅनिची वॅन; अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती माहितीये का?
काजोल पुढे म्हणाली, ‘जेव्हा मी अजयच्या आयुष्यात आले तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता. तसेच मी देखील माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार त्याच्याकडे करायची. त्यानंतर माझा ब्रेकअप झाला. आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नाही. पण आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायचे.’
दरम्यान, पहिल्या भेटीविषयी सांगताना अजय म्हणाला होता की काजोल खूप मोठ्याने बोलायची त्यामुळे तिला पुन्हा भेटायची इच्छा देखील नव्हती. तसेच असे वागणे अजयला आवडत नसल्याचे देखील त्याने सांगितले होते. ‘हलचल चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटल्यानंतर मला काजोलचे पुन्हा तोंडही पाहायचे नव्हते. पण नंतर सर्व काही बदलले’ असे अजय म्हणाला होता.
अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. कजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.