बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण खऱ्या आयुष्यात जरी शांत- गंभीर स्वभावाचा वाटत असला तरी चित्रपटाच्या सेटवर त्याच्या स्वभावाची मस्तीखोर बाजू कोणापासून लपली नाही. सेटवर सहकलाकारांसोबत थट्टामस्करी करणे, त्यांना गमतीशीरपणे फसवणे आणि त्यांच्यासोबत विविध प्रँक्स करणे यांसाठी अजय देवगण ओळखला जातो. पण सोमवारी अजयने केलेला एक प्रँक त्याला चांगलाच महागात पडला आहे. कारण यावेळी त्याने पत्नी काजोलशीच पंगा घेतला आहे.

अजय देवगणने सोमवारी काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केला आणि सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. ‘काजोल देशाबाहेर आहे. तिच्या या व्हॉट्स अॅप क्रमांवरून तिच्याशी समन्वय साधा,’ असं ट्विट करत अजयने काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केला. अजयचं हे ट्विट पाहून नेटकरी अवाक् झाले. काहींनी अजयची खिल्ली उडवली तर काहींनी काजोलचा मेसेज केल्याचा स्क्रिनशॉट रिप्लाय देताना दाखवला. विशेष म्हणजे अजयने शेअर केलेला काजोलचा नंबर ट्रू कॉलर आणि व्हॉट्सअॅप या अॅपवर तपासल्यास तो नंबर खरा असल्याचं आढळलं. नंबर शेअर केल्याच्या काही तासांनी अजयने हा एक प्रँक असल्याचं पुन्हा ट्विट केलं. पण अजयच्या या प्रँकमुळे काजोलचा चांगलाच मनस्ताप झाला आहे.

‘तुझे प्रँक्स आता स्टुडिओच्या बाहेरसुद्धा होऊ लागले आहेत असं दिसतंय. पण त्यांना माझ्या घरात अजिबात प्रवेश नसेल,’ असं उत्तर चिडलेल्या काजोलने ट्विटरवर दिलं. आता यावर अजय काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader