बुद्धिमान अभिनेत्री म्हणून तिची आजही गणना होते. ती आज ना उद्या चित्रपटांमधून परत येईल, अशी तिच्या चाहत्यांना कायम अपेक्षा आहे. पण, या सगळ्याची तमा न बाळगता काजोलने आपला संसार-मुलं, मुलांसाठीच्या जाहिराती आणि त्याच माध्यमातून मुलांसाठी हातात घेतलेलं सामाजिक कार्य यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. मुलांच्या समस्या, त्यांचं छोटंसं भावविश्व याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कु णीही पुढे येत नाही. जाहिरातींच्या माध्यमातून का होईना मला त्यांचं प्रतिनिधित्व करायला आवडतं आणि मला जमेल तेवढं मी करत राहणार, असे अभिनेत्री काजोलने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. आजची मुलं ही उद्याच्या जगाचं भविष्य आहेत. त्यामुळे ही पिढी संस्कारक्षम, बुद्धिमान घडवणं ही आपली जबाबदारी आहे, असं मी मानते. या मुलांच्या समस्यांसाठी ठामपणे उभं राहणारं कोणी नाही. मला मुलांची आवड आहे, त्यांना घडवण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून का होईना माझ्यासारखं कोणीतरी त्यांच्या बाजूने उभं आहे. मला जे जे काही मुलांसाठी करता येईल ते ते मी करत राहणार, असे सांगणाऱ्या काजोलने डायरियाविरोधी मोहीम सध्या हाती घेतली आहे. लाइफबॉय कंपनीच्या ‘हेल्प अ चाइल्ड रीच ५’ या सामाजिक अभियानाचे प्रतिनिधित्व काजोल करते आहे. यानिमित्ताने बोलताना, अतिसारासारखे रोग म्हणजे काही फार अशक्यसाध्य रोग नाहीत. पण, केवळ आपण पालक मुलांना चांगल्या सवयी लावत नाही म्हणून हे रोग त्यांच्यासाठी जीवघेणे ठरत आहेत. पाच वर्षांपर्यंत मूल जगणं हेही लोकांसाठी काही गावांत अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात जगणाऱ्या आपल्यासारख्या अत्याधुनिक विचारांच्या लोकांसाठी ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशा शब्दांत काजोलने खंत व्यक्त केली.
या अभियानांतर्गत ‘हात स्वच्छ धुणे किती गरजेचे आहे’ याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न गावोगावी जाऊन काजोल करणार आहे. यासाठी तिने स्वत: जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संस्थांशी संवाद साधला असून लवकरच ही मोहीम आपल्या देशातच नव्हे तर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पेरू, इंडोनेशिया, केनिया, नायजेरियासारख्या आठ देशांमध्ये नेणार असल्याचेही तिने सांगितले. पूर्वी आपले आईवडील आपल्याला या सवयी जाणीवपूर्वक लावत होते. आजच्या काटय़ा-चमच्यांच्या युगात वावरणाऱ्या आधुनिक विचारांच्या पालकांना या संस्काराची गरज वाटत नाही, पण त्यामुळेच आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या असल्याचे मत काजोलने व्यक्त केले. एक अभिनेत्री म्हणून आपण हा विचार जगभर सहज पोहोचवू शकतो, असे वाटल्यानेच आपण या अभियानात सहभागी झाल्याचेही तिने सांगितले. चित्रपटांपासून सध्या दूर असलेल्या काजोलने आपण अजयबरोबरच्या चित्रपटात आपण काम करणार असल्याची माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा