अभिनेत्री रेणुका शहाणे नऊ वर्षांनंतर एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय. या फॅमिली ड्रामासाठी रेणुका तीन अभिनेत्रींच्या संपर्कात आहे. तीन पिढ्यांच्या महिलांवर आधारित या चित्रपटाची कथा असून सिद्धार्थ मल्होत्रा याची निर्मिती करण्यात असल्याचं समजतंय. सिद्धार्थ मल्होत्रा यांनी याआधी राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.

नवीन वर्षात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. यामध्ये तीन अभिनेत्री मुख्य भूमिकेत असतील. या तीन भूमिकांसाठी रेणुका सर्वोत्तम अभिनेत्रींच्या शोधात आहे. सध्या त्यासाठी शबाना आझमी, काजोल आणि मिथिला पालकर ही तीन नावं चर्चेत आहेत. रेणुका यांनी नुकतीच शबाना आणि काजोल यांची भेटसुद्धा घेतली आहे.

शबाना यांचं अभिनय कौशल्य सर्वश्रुत आहे. हनहुन्नरी कलाकार म्हणून काजोल ओळखली जाते तर मिथिला पालकर हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबत डिजीटल प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘त्रिभंगा’ असं या चित्रपटाचं नाव असून या तीन पिढ्यांच्या महिलांची कथा यामध्ये दाखवण्यात येणार असल्याचं रेणुका यांनी सांगितलं.
नऊ वर्षांपूर्वी ‘रिटा’ या मराठी चित्रपटातून रेणुका यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यामध्ये पल्लवी जोशी आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत त्या स्वत: मुख्य भूमिकेत होत्या.