‘कलंक’सारखा चित्रपट साकारणं दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचे वडील यश जोहर यांचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न ते पूर्ण करू शकले नव्हते. आता करण जोहरने त्याच्या परीने वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. घोषणेपासूनच या मल्टिस्टारर चित्रपटाची खूप चर्चा होती. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळते. इतके कलाकार म्हटल्यावर चित्रपटाकडून फार अपेक्षा ठेवणं स्वाभाविक आहे. पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यात ‘कलंक’ फारसा यशस्वी ठरत नाही.
फाळणीपूर्वीचा काळ, लाहोरमधील हुस्नाबाद इथला हिंदू-मुस्लीम वाद, विवाहबाह्य संबंधातून जन्मलेला मुलगा, कर्तव्यदक्ष मुलगी आणि सून या सर्व घडामोडी एकत्र करून एक कथा सादर करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक अभिषेक वर्मनने केला आहे. कॅन्सरग्रस्त सत्या (सोनाक्षी सिन्हा) आपल्या प्रेमासाठी, पतीसाठी रुपला (आलिया भट्ट) तिच्या घरी घेऊन येते. पण यासाठी रुप तिच्या पतीशी (आदित्य रॉय कपूर) लग्न करूनच घरी येण्याची अट ठेवते. ‘या नात्यात आदर असेल पण प्रेम नसेल’ हे लग्नाच्या पहिल्याच दिवशी देव (आदित्य) रुपला स्पष्ट करतो. गायन शिकण्यासाठी रुप शहरातील हिरामंडी या भागात जाते. तिथे तिची भेट बहार बेगमशी (माधुरी दीक्षित) होते आणि बहार बेगमचा मुलगा जफरच्या (वरुण धवन) प्रेमात ती पडते. जफर हा देवचे वडील (संजय दत्त) आणि बहार बेगम यांच्या अनैतिक संबंधातून जन्मलेला मुलगा असतो. रुप आणि जफरच्या प्रेमापासूनच मूळ कथेला सुरुवात होते. त्यानंतर प्रेम मिळवण्यासाठी रुपची धडपड, वडिलांकडून बदला घेण्यासाठी जफर तडफड आणि त्यादरम्यान होणारा हिंदु-मुस्लीम वाद या कथेत येतो.
मध्यांतरापर्यंत धीम्या गतीने कथा सादर केल्याचं जाणवतं. या सर्व घडामोडींदरम्यान भव्यदिव्य सेट्स, डोळे दिपवून टाकणारी दृश्य लक्षवेधी ठरतात. आलिया, वरुण, आदित्य, सोनाक्षी आणि संजय दत्त यांचं अभिनय उत्तम आहे. तर कुणाल खेमूसुद्धा अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडण्यात यशस्वी ठरतो. ‘देवदास’नंतर पुन्हा एकदा माधुरी दीक्षितच्या दिलखेचक खदा या चित्रपटात पाहायला मिळतात. पण अभिनयात कुठेतरी कमतरता जाणवते.
‘कलंक’मधील गाणी उत्तम आहेत. पण काही वेळानंतर चित्रपटाची कथा उगाचंच ताणल्यासारखं वाटतं. सर्वच उत्तम गोष्टी एकत्र आणून उत्तम कथा प्रेक्षकांना सांगण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न फसलेला आहे. भव्यदिव्य सेट्स, उत्तम वेशभूषा, दमदार संगीत, कलाकारांची फौज असूनसुद्धा ‘कलंक’ प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत नाही. चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीला पाचपैकी चार स्टार, मात्र कथा आणि कथेच्या सादरीकरणाला फक्त दोन स्टार.
swati.vemul@indianexpress.com