‘कल्की : २८९८ एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचा नवीन विक्रम केला आहे. या चित्रपटातून प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारखे दिग्गज कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. आता चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान, कमल हासन यांनी रजनीकांत यांच्याबरोबर कसे संबंध आहेत. भविष्यात ते एकत्रितपणे काम करण्याची काही शक्यता आहे का? याबद्दल खुलासा केला आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, कमल हासन यांनी रजनीकांत यांच्याबरोबर असलेल्या संबंधाविषयी बोलताना म्हटले आहे, “माझ्यात आणि रजनीकांतमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं की, आता एकत्र काम करायचं नाही. आम्ही काही दोन स्पर्धकांसारखे नाही. रजनीकांत आणि माझे गुरूदेखील एकच होते. इतरत्र जशी स्पर्धा असते, तशी आमच्यात स्पर्धा नव्हती; तर आमच्यात नेहमी खुली स्पर्धा होती. त्यामध्ये कधीही शत्रुत्व नव्हते; तर दोन वेगळे मार्ग होते.” पुढे बोलताना त्यांनी, “आम्ही कधीच एकमेकांविषयी टीकाटिप्पणी केली नाही. महत्त्वाचे म्हणजे मी आणि रजनीकांत विशीत होतो तेव्हा हे ठरवले होते. आता आम्ही म्हातारे झालो आणि त्यानंतर आम्हाला हा शहाणपणा आला, असे नाही. त्यामुळे भविष्यात आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली, तर नक्की काम करू. एकमेकांच्या चित्रपटात एखाद्या पाहुण्या कलाकाराच्या स्वरूपातदेखील काम करू शकतो”, असेही म्हटले आहे.

तमीळ चित्रपटसृष्टीत कमल हासन आणि रजनीकांत यांचे वेगळे स्थान आहे. आपल्या अभिनयाने अनेक दशके त्यांनी तमीळ चित्रपटसृष्टी गाजवली आहे. दोघेही चित्रपट निर्माते के. बालाचंदर यांचे शिष्य असल्याने ते अनेक चित्रपटांत एकत्र दिसले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी एकत्र काम केले नाही. मात्र, ते नेहमीच एकमेकांना पाठिंबा देताना दिसले. आजही या दोन दिग्गज अभिनेत्यांची मैत्री टिकून आहे.

हेही वाचा : Video: ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वातीचा चिमुकल्या सईबरोबर श्रेया घोषालच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “आत्या आणि भाची…”

कमल हासन नुकतेच ‘कल्की २८९८ एडी` चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखविताना दिसले आहेत. पौराणिक कथेवर आधारित विष्णूच्या दहाव्या अवताराची गोष्ट दिग्दर्शक नाग आश्विन यांनी या दिग्गज कलाकारांना एकत्र आणून पडद्यावर साकारली आहे. या प्रभास, दीपिका, बिग बी या कलाकारांसोबतच दुलकिर सलमान, मृणाल ठाकूर, विजय देवरकोंडा हेदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखविताना दिसले आहेत. बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. कमल हासन लवकरच एस. शंकर दिग्दर्शित ‘इंडियन २’ चित्रपटात दिसणार आहेत. १९९६ ला प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ चित्रपटात सेनापतीच्या भूमिकेत ते दिसून आले होते. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.