‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने अलीकडेच २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असला तरीही या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आपले रोखठोक मत मांडले होते. यावर आता ‘द केरला स्टोरी’चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा : “पोस्टरखाली सत्यघटनेवर आधारित लिहून…” ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांचे स्पष्ट मत, म्हणाले…
‘द केरला स्टोरी’ दिग्दर्शक सुदीप्तो सेन ‘हिंदुस्थान टाईम्स’शी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट करीत अभिनेते कमल हासन यांना प्रत्युत्तर दिले आहे. सुदीप्तो सेन म्हणाले, “मी आता अशा प्रतिक्रियांना उत्तर देणे बंद केले आहे. आधी मी लोकांना समजवण्याचा खूप प्रयत्न करायचो पण, आता मी असे काही करत नाही. ज्या लोकांनी आमच्या चित्रपटाला प्रोपगंडा म्हटले त्या सर्वांच्या चित्रपट पाहिल्यावर वेगळ्या प्रतिक्रिया होत्या, परंतु ज्या लोकांनी अद्याप ‘द केरला स्टोरी’ पाहिलेला नाही त्यांचे मत मी बदलू शकत नाही.”
सुदीप्तो सेन पुढे म्हणाले, “तमिळनाडूमधील इतर लोकांप्रमाणे कमल हासन सुद्धा चित्रपट पाहू शकले नाहीत आणि त्यांनी चित्रपट न पाहता स्वत:चे एक मत बनवले. पश्चिम बंगाल आणि तमिळानाडूमध्ये चित्रपट रिलीज झाला नाही म्हणून तेथील लोक प्रोपगंडा चित्रपट असे म्हणत आहेत.”
हेही वाचा : IPL 2023 चे विजेतेपद कोणता संघ जिंकेल? उर्वशी रौतेला म्हणाली…
“भाजपा सरकारला हा चित्रपट आवडला याचा अर्थ हा चित्रपट त्यांनी बनवला आहे असा होत नाही. केवळ भाजपाचं नाही तर कॉंग्रेससह इतर काही पक्ष आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ३२ देशांमधील असंख्य लोकांची या चित्रपटाला पसंती मिळत आहे.”, असे या वेळी सुदीप्तो सेन यांनी स्पष्ट केले. तसेच इतर देशांमध्ये मला बैठकांसाठी आमंत्रित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.