तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. ते २ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं. या भाषणादरम्यान त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला. त्यांच्या याच वक्तव्यावर आता कमल हासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्वीट करत कमल हासन म्हणाले, “नागरिकांची एखाद्या गोष्टीशी असहमत असण्याची आणि सतत चर्चा करण्याची क्षमता हे खऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. इतिहासाने आपल्याला वारंवार हे शिकवले आहे की, योग्य प्रश्न विचारल्याने अनेक महत्त्वपूर्ण उत्तरे मिळतात आणि एक चांगला समाज म्हणून आपल्या विकासात योगदान दिले आहे.”
पुढे ते म्हणाले, “उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्मावरील त्यांची मतं मांडण्याचा हक्क आहे. जर तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनाशी असहमत असाल तर त्यांना धमक्या देण्याचा किंवा कायदेशीर बाबीत अडकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तसेच संकुचित राजकीय फायद्यासाठी लोकांना भावनिक करण्यासाठी त्याच्या शब्दांचा विपर्यास करण्याऐवजी सनातनवर आधारित चर्चेत भाग घेणे महत्त्वाचे आहे.”
पुढे कमल हासन म्हणाले, “तमिळनाडू हे मोकळ्या वातावरणातील चर्चांसाठी नेहमीच सुरक्षित स्थान राहिले आहे आणि ते पुढेही राहील. सर्वसमावेशकता, समानता आणि प्रगती करून आपल्या परंपरांचे मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे. सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी चला योग्य ती चर्चा करूया.”
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले होते?
“सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं,” असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.