१९९६ सालचा ‘इंडियन’ हा तमिळ चित्रपट सुपरहिट ठरला होता. कमल हासन अभिनीत आणि एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. यात कमल हासनने सेनापती आणि त्याचा मुलगा चंद्रू अशा दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील एक सैनिक भष्ट्राचाराविरोधात लढाईला उभा राहतो. त्याच्या या प्रवासात त्याला आलेल्या अडचणी, त्याचा संघर्ष इंडियन चित्रपटामध्ये दाखवला आहे. शेवटच्या सीनपर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वल ‘इंडियन २’ येणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी ७ नोव्हेंबर २०१८ रोजी कमल हासनच्या ६४ व्या वाढदिवसच्या निमित्ताने केली होती.
‘इंडियन २’चे दिग्दर्शक शंकर यांनी सिनेमाबद्दलचे महत्त्वपूर्ण ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये शंकर यांनी आजपासून या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होत असल्याचे सांगितले आहे. ‘शुभ प्रभात भारतीयांनो. ‘इंडियन २’च्या उर्वरीत चित्रीकरणास आज सुरुवात झाली आहे हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुमचे आशिर्वाद आणि सदिच्छा आमच्या पाठिशी राहू द्या.’ या ट्वीटसह त्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये कमल हासनचा लूक समोर आला असून त्यात ‘ही इज बॅक’ असे लिहिले आहे.
चित्रपटाच्या घोषणेनंतर थोड्या कालावधीत चित्रीकरण सुरू झाले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये सेटवर खूप मोठा अपघात झाला. चित्रीकरणासाठी वापरल्या जाणारी भलीमोठी क्रेन अंगावर पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर तिथले दहाजण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यानंतर करोना काळात झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे चित्रीकरण लांबणीवर पडले. त्याशिवाय याच कालावधीत विवेक आणि नेंदुमुडी वेंणु या कलाकारांच्या निधनामुळे संपूर्ण काम बंद ठेवण्यात आले.
आणखी वाचा- आमिर खान २ महिन्यांसाठी जाणार अमेरिकेला? ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर अभिनेत्याचा मोठा निर्णय
हा चित्रपट आमच्यासाठी खास आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. सेटवर झालेल्या अपघातामुळे, करोनामुळे आम्हाला काही वेळासाठी थांबावं लागलं. जड अंतकरणाने आम्ही चित्रीकरणाची सुरुवात करणार आहोत. सिनेमाशी संबधित सर्व आघाडींवर काम सुरू होणार आहे. ‘इंडियन २’ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे, असे अभिनेता कमल हासनने म्हटले आहे.
इंडियनचे संगीत ए.आर.रेहमानने दिले होते. आता अनिरुद्ध रविचंद्रनवर चित्रपटाला संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निर्मात्यांनी सोपवली आहे. जयमोहन, कबिलन वैरामुथु आणि लक्ष्मी श्रवणकुमार चित्रपटाचे लेखन करणार आहेत.