सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके हा सतत चर्चेत असतो. वादग्रस्त ट्विट करणं केआरकेच्या आता अंगलट आलं आहे. मंगळवारी (३० ऑगस्ट) त्याला वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्विट केआरकेने केलं होतं. त्यासाठीच त्याला अटक करण्यात आली आहे. पण अटक केल्यानंतर नेमकं काय घडलं हे आता समोर आलं आहे.
आणखी वाचा – केआरकेला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
केआरकेला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या. इतकंच नव्हे तर केआरकेबाबत अनेक मीम्स देखील व्हायरल झाले. पण आता एक वेगळीच माहिती समोर आली आहे. केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्यानंतर काही तासांमध्येच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
एएनआयच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री केआरकेच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं. त्यानंतर त्याला लगेचच कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. केआरकेला मुंबई विमानतळावरून सोमवारी (२९ ऑगस्ट) रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगळवारी (३० ऑगस्ट) दुपारनंतर बोरिवली येथील दंडाधिकारी न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं.
आणखी वाचा – ‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरला अन्…; हैद्राबादमधील चित्रपटगृहामध्ये पोहोचताच विजय देवरकोंडाचे डोळे पाणावले
कमाल खानने २०२० मध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाशी संबंधित अपमानास्पद ट्विट केलं होतं. केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. इरफानच्या निधनानंतर केआरकेने त्याच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं. इरफान निर्मात्यांना नावं ठेवायचा असा आरोप ट्विटच्या माध्यमातून केआरकेने केला. ऋषि कपूर यांच्या बाबतीतही केआरकेने अशीच अपमानजनक ट्विट केल्याचे दाखले सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.