२०२२ वर्ष हे खऱ्या अर्थाने कन्नड चित्रपटसृष्टीसाठी लकी ठरलं आहे. मागच्या वर्षी ‘केजीएफ २’ आणि ‘कांतारा’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचबरोबरीने जगाला कन्नड चित्रपटसृष्टीची ओळख मिळवून दिली. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कांतारा’ चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आता देशाच्या पंतप्रधानांनी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभिनेत्रींची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यश, रिषभ शेट्टी, अश्विनी पुनीत राजकुमार आणि विजय किरागांडूर यांनी मोदींची भेट घेतली. बंगळुरूमधील राजभवनात ही भेट झाली. होम्बाळे प्रॉडक्शन ज्यांनी ‘कांतारा’, ‘केजीएफ २’ यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.
“ऋषभ नाहीतर रिषभ…” ‘कांतारा’ अभिनेत्याबरोबरच्या ‘त्या’ पोस्टमुळे उर्वशी रौतेला ट्रोल
ट्वीटर अकाउंटवर फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिला आहे, “प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यादरम्यान आम्ही नवीन भारत व प्रगतीशील कर्नाटकाला आकार देण्यासाठी मनोरंजन उद्योगाच्या भूमिकेवर चर्चा केली. #BuildingABetterIndia साठी योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आम्हाला प्रेरणा देते. तुमचा पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी एक जग आहे.” अशा शब्दात त्यांनी कॅप्शन दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कलाकारांनी मनोरंजन उद्योग, राज्यातील चित्रपटगृहांची संख्या, चित्रपटांचा प्रभाव आणि अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळू शकते यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. होम्बाळे प्रॉडक्शनने काही दिवसांपूर्वी घोषणा केली की ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल येणार आहे रिषभ शेट्टीने यावर काम सुरु केलं आहे. तर दुसरीकडे ‘केजीएफ ३’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल मात्र या चित्रपटात यश दिसणार नाही त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे.