बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहचला असून या दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीसा पाठवल्या आहेत. कंगनाने मध्यंतरी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ह्रतिकचा उल्लेख सिली (मुर्ख) एक्स असा केला होता. या बदनामीकारक उल्लेखाबद्दल कंगनाने बिनशर्त माफी मागावी, यासाठी ह्रतिककडून गेल्या महिन्यात कंगनाला नोटीस पाठविण्यात आली होती. कंगनानेही या नोटीसीला जशास तसे उत्तर दिले आहे.
हृतिकसारखे एक्स बॉयफ्रेण्ड असेच करतात- कंगना 
कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये माझ्या अशिलाने ‘सिली एक्स’चा उल्लेख करताना कुठेही ह्रतिक रोशनचे नाव घेतले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ह्रतिकने सात दिवसांत स्वत:ची नोटीस मागे घ्यावी, असे कंगनाच्या वकिलांनी म्हटले आहे. याशिवाय रिझवान सिद्दीकी यांनी ह्रतिक आणि कंगना यांचे घनिष्ठ नातेसंबंध असून ह्रतिक हे सत्य नाकारत असल्याचेही म्हटले आहे. मात्र, कंगना यासाठी ज्या इमेल्सचा पुरावा असल्याचा दावा करते, ते माझ्या नावे असलेल्या खोट्या इमेलवरून पाठविण्यात आल्याचा ह्रतिक रोशनचा दावा आहे.

Story img Loader