कंगना राणावत हिला फक्त पाश्चात्य पेहरावात आणि तशाच भूमिकांमध्ये पाहिलेले आहे. मात्र ‘रज्जो’मध्ये कंगना पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना ही उत्तम नर्तिका आहे. ‘रज्जो’चे दिग्दर्शक विश्वास पाटील यांनाही कंगनाच्या या प्रतिभेची माहिती नव्हती. मात्र तिचा पदन्यास पाहून विश्वास पाटील यांनी तिला थेट वैजयंतीमाला आणि वहिदा रेहमान यांच्याच रांगेत नेऊन उभे केले आहे. ‘रज्जो’मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कंगनाची नृत्य अदाकारी चित्रपटातील तीन-चार गाण्यांत दिसणार आहे.
नाटककार जयंत पवार यांच्या कथेवर चित्रपट करण्याचे ठरवल्यानंतर आपल्याला ‘रज्जो’च्या भूमिकेसाठी एक सशक्त अभिनेत्री हवी होती. याआधी या चित्रपटाचे चित्रीकरण आपण दोन-तीन अभिनेत्रींसह केले. मात्र हवा तसा परिणाम साधत नव्हता. त्यामुळे कंगनाची निवड करून पूर्ण चित्रपट पुन्हा चित्रित करण्यात आल्याचे पाटील यांनी ‘वृत्तांत’ला सांगितले. हा चित्रपट स्वत:च दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेण्याआधी आपण ज्येष्ठ छायांकनकार बिनोद प्रधान यांच्याकडे ७-८ वर्षे साहाय्यक म्हणून काही धडे गिरवल्याचेही त्यांनी स्पष्ट  केले.
कंगनाला आतापर्यंत सर्वानीच मॉडर्न मुलीच्या भूमिकेत पाहिले आहे. मात्र ती एक सुंदर भारतीय मुलगी आहे. तिला कथ्थक नृत्य येते आणि तेदेखील एवढय़ा चांगल्या प्रकारे नाचता येते, हा आपल्यालाही सुखद धक्का होता, असे पाटील म्हणाले. उत्तम सिंग यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटात कंगनाने उत्तम नृत्याविष्कार केल्याचे पाटील म्हणाले. चित्रपटात पारस अरोरा हादेखील महत्त्वाची भूमिका करत आहे. हा चित्रपट पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.