बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मागच्या काही दिवसांपासून तिच्या तिखट प्रतिक्रियांसाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने दीपिका पदुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता तिने अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’वर निशाणा साधला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवरून कंगनानं एक पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच एका लहान मुलीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती मुलगी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील आलिया भट्टच्या भूमिकेची नक्कल करताना दिसत आहे. यावरून कंगना भडकली आहे.

कंगनानं याबाबत तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहिलं, ‘सरकारनं अशा सर्व पालकांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे जे आपल्या मुलांकडून अशाप्रकारे व्हिडीओ बनवून चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. एक प्रसिद्ध वेश्या आणि तिच्या दलालाचा हा बायोपिक आहे. जी आपली ताकद वाढवण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना मुली पुरवण्याचं काम करत होती. अशाप्रकारे अल्पवयीन मुलांकडून व्हिडीओ बनवून त्यातून पैसा कमावणाऱ्या पालकांवर कारवाई करायला हवी. माननीय माहिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणीजी आपण याकडे लक्ष द्या.’

याशिवाय या व्हिडीओबद्दल बोलताना कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘ही लहान मुलगी तोंडात विडी घेऊन असे अश्लिल संवाद बोलतेय, तिनं अशाप्रकारे एका सेक्स वर्करची नक्कल करणं योग्य आहे का? तिचे हावभाव पाहिलेत का? या वयात तिच्या चेहऱ्यावर अशाप्रकारचे हावभाव शोभा देतात का? या प्रकारे अशा बऱ्याच मुलांचा वापर केला जात आहे.’

दरम्यान मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader