मुंबईच्या वांद्रे परिसरातील रिझवी कॉलेजजवळ रवीना टंडनची भररस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. पार्किंगच्या वादानंतर स्थानिक नागरिकांनी रवीना टंडनशी हुज्जत घालत तिला धक्काबुक्की केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्री आणि भाजपाची उमेदवार कंगना रणौत रवीना टंडनच्या पाठिंब्यासाठी समोर आली आहे. रवीना टंडनशी धक्काबुक्की करणाऱ्या महिलांचा कंगनाने निषेध केला आहे. तसेच विनाकारण छळणाऱ्या या महिलांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवर एका स्टोरीच्या माध्यमातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “रवीना टंडनजी यांच्याबरोबर जे घडले, ते अतिशय धक्कादायक आणि आपल्याला इशारा देणारे आहे. रवीना टंडन यांच्याशी हुज्जत घालणाऱ्यांमध्ये आणखी ५ ते ६ लोक असते तर रवीना टंडन यांचे लिंचिंगही झाले असते. या संतापजनक घटनेचा मी निषेध करते. अशा लोकांना कडक शिक्षा दिली पाहीजे. त्यांनी अतिशय हिंसक आणि विखारी कृत्य केले आहे”, असा शब्दात कंगना रणौतने आपली नाराजी व्यक्त केली.

“तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, रवीना टंडनची भररस्त्यात बाचाबाची; कार पार्किंगवरून वाद, प्रकरण थेट पोलिसांत!

रवीना टंडन यांच्याबरोबर काय झालं?

शनिवारी रात्री रवीना टंडन आपल्या घरी परतत असताना त्यांच्या वाहनाच्या चालकाचा पार्किंगवरून काही महिलांशी वाद झाला. या वादाचा एक व्हिडीओ मोहसीन शेख नामक व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रवीना टंडन वारंवार मारू नका, मारू नका, असे सांगत आहे. तर त्याचवेळी एक व्यक्ती आणि महिला रवीना टंडनच्या चालकावर मारहाणीचा आरोप करत आहे. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे, ज्यामध्ये रवीना टंडनच्या वाहनाचा महिलेला धक्का लागलाच नसल्याचे दिसते.

मुंबई पोलिसांनीही रवीना टंडनच्या विरोधातली तक्रार खोटी असल्याचे सांगितले आहे. यानंतर रवीना टंडननेही एक्स अकाऊंटवर सविस्तर माहिती दिली आणि पोलिसांचे आभार मानले.
https://twitter.com/TandonRaveena/status/1797336163730210879

पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत खटला दाखल करण्यात आलेला नाही. “रवीना टंडन शनिवारी घरी येत असताना त्यांचे वाहन मागे घेत असताना रस्त्यावरील महिलेने चालकाला सांभाळून वाहन चालविण्यास सांगितले. यावेळी वाहनाचा धक्का महिलेला लागला नव्हता. मात्र त्यांच्यात बाचाबाची झाली. रवीना टंडन यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांनाही धक्काबुक्की केली.

कुणीही जखमी नाही, पोलिसांची माहिती

या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, कुणालाही मारहाण झाली नसून शाब्दिक बाचाबाचीमुळे हा वाद वाढला. मात्र, कार पार्किंगमुळे निर्माण झालेला हा वाद आता मिटला आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Story img Loader