बॉलीवूडमधील छुपी प्रेमप्रकरणे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात सध्या सुरू असलेल्या लढाईमुळे बॉलीवूडजनही चक्रावले नसतील तरच नवल. ह्रतिकचे नाव न घेता आपल्या आयुष्यात तो जोडीदार म्हणून येणार असल्याचा दावा कंगनाने पहिल्यांदा केला होता. तेव्हापासून कंगना आणि हृतिक यांच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल बाहेर पडणाऱ्या एकेक गोष्टी सगळ्यांनाच धक्के देणाऱ्या ठरल्या आहेत. एका जाहीर कार्यक्रमात कंगनाने ‘माजी प्रियकर मूर्खपणाचे उद्योग करत असतात’, अशा शब्दांत ह्रतिकची जाहीर निर्भर्त्सना केली होती. त्या प्रकरणावरून ह्रतिकने तिच्या मागे जाहीर माफी मागण्याचा धोशा लावला. पाठोपाठ आपल्या ई-मेल आयडीवरून भलताच कोणीतरी ह्रतिक रोशन म्हणून चाहत्यांशी संवाद साधत असल्याची तक्रार करत हृतिकचे हे प्रकरण सायबर सेलकडे पोहोचले. मात्र तिथून आत्तापर्यंत हे प्रकरण धसास लागण्यापेक्षा एक मेकांना कायदेशीर नोटीस, आरोप-प्रत्यारोप करत चिघळतच गेले आहे. मात्र फॉरेन्सिक तपासणी, सायबर सेलचा तपास यातून ह्रतिकच्या विरोधात कंगनाने केलेल्या एकाही दाव्यात तथ्य आढळले नाही. एवढेच नाही तर कंगनाने जी छायाचित्रे लीक केली तीही खोटी असल्याचा दावा सुझ्ॉन खानने केला असून कंगनाचा माजी प्रियकर अध्ययननेही यात ह्रतिकची बाजू घेतली असल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.
ह्रतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. या दोघांमध्ये नक्की कोण खरे बोलते आहे, याचा जोरदार तपास लावला जातो आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच ह्रतिकवर दोषी म्हणून सगळ्यांच्या नजरा आहेत आणि तरीही हे प्रकरण धसास लावण्यासाठी त्याने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. ह्रतिकने आपल्याला २०१४ मध्ये पॅरिस येथे मागणी घातली होती, असा दावा कंगनाने केला होता. मात्र त्यावेळी ह्रतिक पॅरिसमध्ये नव्हता, असे सिद्ध झाले. कंगनाने पहिल्यांदा ह्रतिकशी ज्या ई-मेल आयडीवरून संपर्क साधला होता तो त्याचा नव्हता. करण जोहरच्या पार्टीत तिला ह्रतिककडून पहिल्यांदा अधिकृत ई-मेल आयडी मिळाला होता. मात्र या ई-मेल आयडीवर कंगना आणि ह्रतिकमध्ये जो मेलवरून संवाद झाला त्यात ह्रतिकला तिच्याबद्दल आकर्षण असल्याची कुठलीही गोष्ट आढळलेली नाही. उलट, कंगनाला ह्रतिकबद्दल लहानपणापासून आकर्षण होते हे तिने मेलमध्येही मान्य केले आहे. ह्रतिकने कंगनाला फार कमी वेळा मेलवरून उत्तर दिले असल्याने कंगनाचे यासंदर्भातील आत्तापर्यंतचे दावे फोल ठरले आहेत. एवढेच नाही तर या दोघांमध्ये काही संबंध होते, असे सांगणारे छायाचित्र किंवा अन्य गोष्टीही कंगनाला देता आलेल्या नाहीत. तरीही गेल्या आठवडय़ात तिचे आणि ह्रतिकचे पार्टीतील छायाचित्र लीक झाले होते. मात्र हे छायाचित्र बनावट असल्याचा दावा त्या पार्टीला हजर असलेल्या सुझ्ॉन खानने केला आहे. सुझनने आणखीही काही छायाचित्रे टाकली आहेत ज्यात ह्रतिक एकटा कुठेही टाकली आहेत ज्यात ह्रतिक एकटा कुठेही कंगनाबरोबर नाही. या सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक घडत असताना अध्ययन सुमनने दिलेल्या जाहीर मुलाखतीमुळे कंगनाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित ‘राझ ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने अध्ययन सुमन आणि कंगना राणावत दोघेही एकत्र आले होते. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकथा बहरली आणि वर्षभराच्या आतच त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. मात्र त्यानंतर अध्ययन सुमन हे नाव जणू गायबच झाले होते. कंगनाशी नाते संपल्यानंतर अध्ययन एकूणच रुपेरी पडद्याच्या झगमगाटापासून लांब गेला होता. त्याचे हे लांब जाणे कंगनामुळे होते, याची कबुली त्याने आता दिली आहे. एखाद्याची दोन रूपे असावीत अशा पद्धतीने कंगनाची दोन वेगवेगळी रूपे आपण पाहिली आहेत. प्रसिद्धीमाध्यमांसमोर किंवा लोकांसमोर गोडगोड बोलणारी कंगना एकांतात मात्र आपल्याला शिवीगाळ करत होती, तिने आपल्याला मारहाणही के ली होती, असे अध्ययनने म्हटले आहे. मात्र त्यावेळी आपण वयाने लहान होतो, विसाव्या वर्षी आपण तिच्या प्रेमात पडलो होतो, आजूबाजूचे जगही फारसे अनुभवले नव्हते त्यामुळे कंगनाच्या या वागण्याचा नेमका काय अर्थ घ्यावा, याबद्दल कायम गोंधळात असायचो असे सांगणाऱ्या अध्ययनने कं गना स्वत:च ह्रतिकच्या मागे होती, असे सांगितले.
‘काईट’ या चित्रपटापासूनच कंगनाला ह्रतिकविषयी ओढ वाटत होती. तिच्या मोबाइलवरच्या मेसेजवरूनही हे आपल्या लक्षात आले होते. त्यावेळी कित्येकदा कंगनाबरोबर ह्रतिक आणि सुझ्ॉनच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. त्यावेळपासून कंगना ह्रतिकच्या मागे होती, असे अध्ययनने म्हटले आहे. कंगनाच्या मत्सरी स्वभावापासून जादूटोण्यात तिला असलेला रस याबाबतीत त्याने अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी कुठलाही आडपडदा न ठेवता त्याने माध्यमांसमोर जाहीर केल्या आहेत. अध्ययनच्या या खुलाशामुळे ह्रतिक-कं गना प्रकरणाला नवे वळण लागले आहे. कंगनाने दिलेली छायाचित्रेही खोटी असल्याचे खुद्द सुझ्ॉन खाननेच जाहीर के ल्यामुळे पहिल्यांदाच ह्रतिकच्या म्हणण्याला बळकटी मिळाली आहे. मात्र या नव्या ‘अध्ययन’ खुलाशामुळे तरी या प्रकरणातील सत्य बाहेर पडायला मदत होणार का? याबद्दल अजूनही साशंकता आहे.

Story img Loader