बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावतची बॉलीवूडमधल्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘मेट्रो’ यांसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिने केवळ रसिकांवरच नाही तर चित्रपट समीक्षकांवरही छाप पाडली. क्वीनच्या यशानंतर कंगनाने तिच्या मानधनात वाढ केल्याची चर्चा होती. मात्र, कंगनाने यास नकार दिला आहे.
“कंगना म्हणाली की, तसे काहीच नाही. क्वीननंतर मी माझे मानधन वाढवलेले नाही. पैशाचा प्रश्नच नाही. लोकांना जसं अपेक्षित आहे तसे मी चित्रपट स्वीकारत नाही आहे. त्यांना वाटतं क्वीननंतर मी १० चित्रपट लगेच करायला हवेत. मी तसं अजीबात करत नाहीयं पण बहुतेक लोकांच तसं मत आहे. ” यावर्षी कंगनाचा ‘अग्ली’ हा केवळ एकच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकावेळी एकच चित्रपट स्वीकारण्याचा पवित्रा तीने स्वीकारला आहे. तसेच, ऑगस्टमध्ये ती आर. माधवनसोबत ‘तनू वेड्स मनू २’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी ती रिमा काग्तीच्या चित्रपटास सुरुवात करणार असून भारतातील पहिला फ्रेन्च निर्मिती असलेल्या  ‘डीव्हाइन लव्हर्स’च्या चित्रीकरणास सुरुवात करेल. मी एकावेळी एकच चित्रपट करत आहे. त्यामुळे माझ्या तारखांमध्ये कोणतीही गफलत नाही होत. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत मी रीमाच्या चित्रपटास सुरुवात करेन. यावर्षाच्या शेवटी इरफानसोबत मी ‘डीव्हाईन लव्हर्स’चे चित्रीकरण करेन, असेही ती म्हणाली.

Story img Loader