बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. जावेद अख्तर आणि कंगना रणौतच्या मानहानीच्या खटल्याची सुनावनी ४ जुलैला महानगर दंडाधिकारी न्यायालयात झाली. या सुनावणीला कंगना रणौतही उपस्थित होती. यावेळी कंगनाचं स्टेटमेंट घेण्यात आलं आणि हे स्टेटमेंट देत असताना केवळ वकील आणि कंगनाची बहीण त्या ठिकाणी उपस्थित असेल अशी विनंती कंगनाने न्यायालयाला केली होती.

या प्रकरणात कंगनाच्या बाजूने तिची बहीण रंगोली चंडेल साक्षीदार म्हणून उपस्थित होती. “जेव्हा मी हृतिक रोशनची माफी मागण्यास नकार दिली त्यावेळी जावेद अख्तर यांनी माझा अपमान केला होता. जावेद अख्तर यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त केलं होतं ज्यामुळे मी मानसिक तणावाखाली होते. तसेच त्यांनी तुला याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील दिली होती.” असे आरोप कंगनानं आपल्या स्टेटमेंटमध्ये केले आहेत.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, कंगनाने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं, “ते मला म्हणाले होते की विश्वासघातकी लोकांना धडा शिकवायला आम्हाला वेळ लागणार नाही. त्यानंतर सर्वांना वाटेल की तुझं अफेअर फक्त हृतिकसोबत नव्हतं ती एक विश्वासघात करणारी व्यक्ती आहेस, लोक तुझ्या तोंडाला काळं फासतील. तुझी प्रतिमा लोकांमध्ये एवढी वाईट होईल की तुला आत्महत्या करण्यापलिकडे काहीच पर्याय राहणार नाही. आमच्याकडे पुरावे आहे. राजकीय ताकद आहे. माफी मागून स्वतःला वाचव. एक चांगल्या घरातील मुलगी या सगळ्यात विनाकरण अडकेल. त्यामुळे जर तुला जराही लाज वाटत असेल तर स्वतःचा सन्मान वाचव.”

दरम्यान जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगना रणौतच्या विरोधात मानहिनीचा खटला दाखल केला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युनंतर कंगनाने बालिवूडमधील घराणेशाहीवर टीका करताना अख्तर यांच्याबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर अख्तर यांनी तिच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती.

Story img Loader