‘तनू वेड्स मनू रीटर्न्स’ या चित्रपटाचे यश साजरे करीत असलेल्या कंगना राणावतला भविष्यात चित्रपटसृष्टीतील स्थान आणखी मजबूत करण्यावर भर द्यायचा असून, सध्यातरी लग्नाचा कोणताही विचार मनात नसल्याचे तिने सांगितले.
चित्रपटसृष्टीमध्ये स्थान कमविण्यासाठी आपण मागील दहा वर्षांहून अधिक काळ मेहेनत केली. त्यामुळेच आज मी या स्थानापर्यंत पोहोचू शकले. यापुढे असेच चांगले काम करुन माझे चित्रपटसृष्टीतील भविष्य सुरक्षित करण्यावर भर देणार असल्याचे तिने सांगितले. लग्नासाठी कोणतेही वय नसते. केवळ तुमचे वय २८ वर्षे आहे म्हणून तुम्ही लग्न करुन मुलांना जन्म देऊन संसार थाटावा, असे नाही.
आयुष्यात एक काळ असा असतो की तुम्ही स्वत:मधील कर्तृत्त्व सिद्ध करण्यासाठी झगडत असता त्यानंतर दुसरा काळ असा येतो की हे झगडणे संपल्यावर स्वत:च्या क्षमतेपलीकडे जाऊन काहीतरी नवीन साध्य करण्याचे आव्हान तुमच्यासमोर असते. आता नेमके याच काळाला सामारे जाऊन आणखी यश संपादित करणार असल्याचे तिने सांगितले. ‘क्वीन’ या चित्रपटानंतर ‘तनू वेड्स मनू रीटर्न्स’ हा चित्रपट दुप्पट आनंद देणार ठरला आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये एक नवीन प्रवास सुरु झाल्याची भावना आपल्या मनात निर्माण झाल्याचे तिने सांगितले. कंगनाला अलीकडेच ‘क्वीन’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. ‘तनू वेड्स मनू रीटर्न्स’ हा २०११ मघ्ये प्रदर्शित झालेल्या ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Story img Loader