सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करणं अखेर अभिनेत्री कंगना रणौतला महागात पडलं आहे. कंगणा रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील अनेक घडामोडींवर परखड मत व्यक्त करत होती. एवढचं नव्हे तर कंगनाने विविध ट्विट करत अमेरिकेसह इतर देशावर देखील निशाणा साधला आहे. यानंतर कंगनाने बंगाल निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमुळे ती अधिक चर्चेत आली. यानंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं.
ट्विटरच्या या निर्णयानंतर कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टा स्टोरीला काही फोटो शेअर करत कंगनाने ट्विटरच्या कारवाईनंतर तिचं मत मांडलं आहे. यात कंगना म्हणालीय, “मी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्विटरने माझं अकाऊंट बंद केलं.”
तर एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कंगनाने ट्विटरवर पलटवार केले आहेत. “ट्विटरने फक्त माझा मुद्दा सिद्ध केला आहे की ते जन्माने अमेरिकन आहेत. गहुवर्णीय (Brown People) लोकांना गुलाम बनवणं हा आपला हक्क आहे असं अमेरिकेला वाटतं. आपण काय विचार करावा, आपण काय बोलावं आणि काय करावं हे ते ठरवतात. आवाज उठवण्यासाठी नशीबाने माझ्याकडे इतर पर्याय देखील आहेत. शिवाय माझ्या सिनेमाच्या मदतीने देखील मी माझं मत मांडू शकते.” असं कंगना म्हणाली आहे.
Twitter has only proved my point they’re Americans & by birth, a white person feels entitled to enslave a brown person, they want to tell you what to think, speak or do. I have many platforms I can use to raise my voice, including my own art in the form of cinema: Kangana Ranaut pic.twitter.com/isGS4QqOQo
— ANI (@ANI) May 4, 2021
पहा फोटो: कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्विट केले होते. सोमवारी सायंकाळी कंगाने केलेल्या या ट्विट्समध्ये अनेक वादग्रस्त आरोप करण्यात आलेले. त्यानंतर आज सकाळी कंगनाचं ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगवनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
बंगाल निवडणूकीत भाजपाच्या पराभवानंतर कंगनाने अनेक ट्विट केले होते. काही ट्विटस् हे खळबळजनक असून हिंसा वाढवणारे असल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला होता. तर काही ट्विटमध्ये तिने बंगालमधील हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचं म्हंटलं होतं. याशिवाय नाव न घेता कंगनाने ममता बॅनर्जी यांची तुलना रावणाशी केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. अखेर ट्विटरने कारवाई करत कंगनाचं अकाऊंट कायमचं बंद केलं.