तापसी पन्नू आणि कंगना रणौत या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयावर वाद सुरूच असतो. एकीकडे कंगनाने तापसीला ‘सस्ती कॉपी’ म्हटलं, तर दुसरीकडे तापसीने कंगनाला ‘डबल फिल्टर वापरण्याचा सल्ला दिला. कंगनाचं ट्विटर अकाउंटवर ब्लॉक केल्यावरून या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. “ट्विटरवर कंगनाची आठवण येत नाही, माझ्यासाठी कंगना महत्वाची नाही, असं तापसीने म्हटलं. यावर आता तापसीला कंगनाने जबरदस्त उत्तर दिलंय.
तापसीने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत कंगनाच्या ट्विटर अकाउंटवर केलेल्या बंदीबाबत तापसीने वक्तव्य केलं. “नाही, मला तिची आठवण येत नाही आणि तिला पुन्हा एकदा तिथे पाहण्याची माझी इच्छा नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तिचं काही महत्व नाही. ती एक कलाकार आणि आदरणीय सहकारी आहे पण त्यापेक्षा माझ्या आयुष्यात तिचं जास्त महत्व नाही. मला तिच्याबद्दल चांगली किंवा वाईट भावना नाही,” असं देखील तापसी म्हणाली.
कंगनाचं जबरदस्त उत्तर
तापसीने केलेल्या वक्तव्यावर कंगनाने आता तिला जबरदस्त उत्तर दिलंय. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत तापसीला तोडीस तोड उत्तर दिलंय. यात तिने लिहिलंय, “कंगनाने जे चित्रपट सोडले आहेत ते चित्रपट प्लीज मला द्या, असं म्हणत तापसी प्रोड्यूसर्सकडे भीक मागत होती आणि आज तिची मजल तर बघा…’गरीब प्रोड्यूसर्सची कंगना’ असं तिला म्हटल्यावर अभिमान वाटत होता, आज मी तिच्यासाठी महत्त्वाची नाही, असं म्हणतेय. असो, तुझ्या आगामी चित्रपटांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!”
तापसीने केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना कंगनाने तिला बी-ग्रेड अभिनेत्री म्हणत एक आव्हान देखील केलंय. “स्वतःच्या चित्रपटांना माझ्या उल्लेखाशिवाय प्रमोट करून दाखव”, असं आव्हानच कंगनाने तापसीला केलंय.

अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सुद्धा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात तापसीसोबत अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे सुद्धा झळकणार आहेत.
तर कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘थलायवी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल, अशी अफवा काही दिवसांपूर्वीच पसरली होती. परंतु, यावर कंगनाने पुढे येत ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर केवळ चित्रपटाचा प्रिमियर रिलीज करण्यात येणार असून चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करण्यात येणार असल्याचं तिने सांगितलं.