ऑल्ट बालाजीवरील ‘लॉक अप ‘ शो मागच्या काही काळापासून त्याच्या आगळ्या- वेगळ्या थीम आणि संकल्पनेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये स्वतःला शोमधून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक सदस्याला स्वतःचं एक सीक्रेट सांगावं लागतं. अलिकडेच या शोच्या विजेतेपदाचा मजबूत दावेदार मानल्या जाणाऱ्या मुनव्वर फारूखीनं त्याच्या बालपणाविषयी धक्कादायक खुलासा केला. बालपणी आपण लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचं यावेळी मुनव्वरनं सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुनव्वरचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांना धक्का बसला होता. यानंतर या शोची होस्ट कंगना रणौतनं देखील स्वतःच्या बालपणाबद्दल खुलासा करत सर्वांना आणखी एक धक्का दिला. प्रत्येक वर्षी कित्येक लहान मुलांना या अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र आपण सार्वजनिक मंचावर या घटना किंवा विषयावर बोलत नाही असं यावेळी कंगना म्हणाली. देशातील जवळपास सर्वच मुलांना लहान वयातच नको असलेल्या किंवा वाईट स्पर्शाचा सामना करावा लागतो आणि मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे असंही यावेळी कंगनानं स्पष्ट केलं.

कंगना म्हणाली, “जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या गावातील माझ्यापेक्षा वयाने २-३ वर्षांनी मोठा असलेला मुलगा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. पण त्यावेळी हे सर्व समजण्याचं माझं वय नव्हतं. त्यामुळे माझ्यासोबत काय घडतंय किंवा जे घडतंय ते चुकीचं आहे हे मला कळत नव्हतं. लहान वयात असं करणाऱ्या मुलांना शिक्षा दिली जात नाही कारण वयाने लहान असल्याने कोणत्याही गोष्टीची समज नसते. पण या घटना ज्या मुलांसोबत घडतात त्यांच्या मनात मात्र अशा गोष्टींना आयुष्यभरासाठी एक विशिष्ट प्रकारची भीती निर्माण होते.”

दरम्यान कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर सध्या ती ‘लॉकअप’ शोचं होस्टिंग करत असून या शोनं फारच कमी काळात बरीच लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय कंगना रणौतकडे बरेच चित्रपट आहेत. ती लवकरच ‘धाकड’आणि ‘तेजस’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या वर्षी ती शेवटीची तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक ‘थलायवी’मध्ये दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut shocking statement about sexual harassment in her childhood mrj