कंगना रणौतचा आगामी ‘सिमरन’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात एका एनआरआय गुजराती मुलीची व्यक्तिरेखा कंगना साकारत आहे. या मुलीला चोरी करण्याचा आजार असतो असे दाखवण्यात आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का काही लोक सवयीचा भाग म्हणून चोरी करतात. असे नाही की त्यांच्याकडे पैसे नसतात पण त्यांना चोरी करण्याची सवयच लागलेली असते. हा एक आजार आहे, याला ‘क्लेप्टोमेनिया’ असं म्हणतात. या आजारात लोकांना चोरी करावीशी वाटते. अनेक कलाकारांना या आजाराने ग्रासले असून, त्यांनी याबद्दल खुलासाही केला आहे. ‘आज तक’ने अशाच काही कलाकारांच्या या आजाराचे वृत्त प्रसिद्ध केले
यात पहिलं नाव येतं ते ब्रिटनी स्पीअर्सचं. अगदी कमी वयात ब्रिटनी एक स्टार झाली होती. पण ती ‘क्लेप्टोमेनिया’ने ग्रस्त होती. अनेकदा तिने याबद्दल खुलासा करत सांगितले की ती दुकानात खरेदीला गेल्यावर तिथल्या वस्तू चोरायची.
विनोना रायडरचे सुंदर डोळे पाहून कोणालाही हे खरं वाटणार नाही की तिही ‘क्लेप्टोमेनिया’ ग्रस्त होती. विनोना एकदा शॉपिंगला गेली असता तिने त्या दुकानातून ५००० डॉलर्सचे सामान चोरले होते. हे सामान चोरी करताना तिला पकडण्यातही आले होते. नंतर तिला ६३५५ डॉलर्सचा दंड भरावा लागला होता.
लिंडसे लोहानला कमी वयातच प्रसिद्धी तर मिळालीच पण, लहान वयातच ती अमली पदार्थांच्या आहारी गेली होती. कॅलिफोर्नियाच्या एका दुकानातून नेकलेस चोरताना तिला पकडण्यात आले होते. पण नंतर तिने तो नेकलेस कर्जावर घेतल्याचे म्हटले होते. पण ही गोष्ट स्पष्ट करुन दाखवण्यासाठी तिच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते.
फराह फॉसेटला आपण सर्वच ‘चार्लीज अँजल्स’ची स्टार म्हणून ओळखतो. तिला दोन वेळा वेगवेगळ्या दुकानातून कपडे चोरताना पकडण्यात आले आहे.
टेनिस खेळाडू जेनिफरलाही ‘क्लेप्टोमेनिया’ आजार होता. तिला एकदा १५ डॉलरची अंगठी चोरी करताना पकडण्यात आले होते. यावर स्पष्टीकरण देताना तिने म्हटले की, खूप साऱ्या अंगठ्या हातात घालून बघत असताना ती अंगठी हातातच राहिली.
सर्वसामान्यपणे ‘क्लेप्टोमेनिया’ हा आजार अधिकतर महिलांना होतो असे मानले जाते. पण रेक्स रीड हे याला अपवाद ठरले. टिव्ही प्रस्तुतकर्ता आणि हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेल्या रेक्स यांना २००० मध्ये सीडी चोरी करताना पकडण्यात आले होते.
पीचेस गेल्डॉफ ही यूकेची एक सेलिब्रिटी आहे. पीचेसला अनेकदा वेगवेगळ्या दुकांनांमधून कपडे चोरी करताना पकडण्यात आले आहे. एवढंच काय तर ती अंतर्वस्त्रही चोरायची. फोटोशूट दरम्यान येणारे कपडे चोरी करण्यासाठीही ती ओळखली जायची.
तिला टकीला या सेलिब्रिटीला रिअॅलिटी शोमध्ये पाहण्यात आले आहे. एकदा तर तिला दुकानातून चिप्सचं पाकीट चोरताना पकडलं होतं. नंतर याचा स्वीकार करत टकीलाने म्हटले की, चोरी करताना तिला कधी कोणी पकडणार नाही असं नेहमीच तिला वाटायचं.
कॅरोलिन ग्यूलियानी ही प्रसिद्ध सेलिब्रिटी रुडी ग्यूलियानीची मुलगी आहे. कॅरोलिनला अनेकदा दुकानातून मेकअपचे सामान चोरी करताना पकडण्यात आले आहे.
स्टेफनी प्रॅट टिव्ही सिरिअल ‘द हिल्स’मध्ये दिसली होती. प्रसिद्ध होण्याआधी तिच्यावर १३०० डॉलर्सचे सामान चोरी करण्याचा आरोप होता.