गेल्या काही दिवसांपासून कॉमेडीयन तन्मय भट्ट चांगलाच चर्चेत आहे. एका कॅम्पेनसाठी कोटक बँकेने तन्मय भट्टशी करार केला होता आणि त्याची एक जाहिरातही चांगलीच चर्चेत आली होती. पण नंतर लगेच तन्मय भट्टवर जोरदार टीका होताना पाहायला मिळाली. सोशल मीडियावर हे कॅम्पेन बंद करण्याची मागणी होऊ लागली आणि याला कारणीभूत ठरली ती तन्मय भट्टने खूप आधी केलेली काही ट्वीट्स.
खूप वर्षांपूर्वी तन्मय भट्टने लहान मुलं, पारसी समाज आणि चाइल्ड पॉर्न याबद्दल केलेली काही ट्वीट्स पुन्हा चर्चेत आली आहेत. यामुळे या जाहिरातीत तन्मय भट्टला बघून बऱ्याच लोकांनी याविरुद्ध बोलायला सुरुवात केली. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेसुद्धा याविरोधात ट्वीट करत कोटक बँकला टॅग करत खडेबोल सुनावले. एकूणच डाव्या विचारसरणीच्या लोकांनी कशाप्रकारे ट्विटरचा गैरवापर करून बऱ्याच लोकांची दिशाभूल केली आहे हे कंगनाने या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.
कंगना ट्वीटमध्ये म्हणाली, “बहुतेक उजव्या विचारसरणीच्या विचारवंतांची अडचण अशी आहे की त्यांना डाव्या विचारसरणी विचारवंतांची निवड ही चुकीची भासते, कृपया समजून घ्या ज्या गोष्टीला तुमचा आक्षेप आहे त्याच गोष्टीसाठी तन्मयला ब्रँड मॅच म्हणून निवडण्यात आलं आहे, चाइल्ड पॉर्न हा एक मोठा उद्योग आहे. अमेरिकेतीलच नव्हे तर साऱ्या जगातील डाव्या विचारसरणीचे विचारवंत यांचं याकडे जरा तरी लक्ष आहे का.”
याच गोष्टीला आळा घालण्यासाठी एलॉन मस्क यांनी ट्विटर आपल्या हातात घेतलं असल्याचा दावाही कंगनाने तिच्या या ट्वीटमध्ये केलेला आहे. एकूणच ही अशी आक्रमक ट्वीट आणि सोशल मीडियावर करावा लागणारा बॉयकॉट सामना यामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटकडून यासंदर्भात ट्वीट करण्यात आलं असून त्यांनी तन्मय भट्टचं हे कॅम्पेन रद्द केलं असल्याचं स्पष्ट केलं आहे.