अभिनेत्री कंगना रणौत ही आपल्या सडेतोड आणि बंडखोर स्वभावासाठी ओळखली जाते. करण जोहर, आलिया भट्ट , हृतिक रोशन सारख्या अनेक बड्या कलाकारांवर जाहीर टीका करणाऱ्या कंगनानं आपला मोर्चा आता अभिनेता रणबीर कपूरकडे वळवला आहे. रणबीर हा बेजबाबदार असल्याचं तिनं म्हटलं आहे.
कंगनानं ‘मणिकर्णिका’चं यश साजरं करण्यासाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीत कंगनाला राजकरणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला होता या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं आपला मोर्चा रणबीरकडे वळवला. बॉलिवूडमधले अनेक कलाकार राजकारणावर बोलणं टाळतात. त्यापैकी रणबीर कपूर एक आहे. माझ्या घरी पाणी रोज येतं. सर्व सुविधा मला मिळतात मग मी राजकारणावर का बोलू असं विधान एका मुलाखतीत रणबीरनं केलं होतं. यावर कंगनानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य जनतेमुळे तू सुख उपभोगत आहे असं असताना अशी वक्तव्य करणं बेजबाबदारपणाचं आहे अशी टीका कंगानानं केली आहे.
अभिनेता जॉन अब्राहम देखील कंगनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला आहे. एखाद्या कलाकाराला राजकारणाविषयी माहिती असली पाहिजे. जर माहिती असली तर तर मतप्रदर्शन करण्यास काय हरकत आहे असं जॉन म्हणला. कंगना रणौतला प्रत्येक गोष्टीची माहिती असते हे खूपच चांगली गोष्ट आहे असंही जॉन म्हणला. देशात काय सुरू आहे हे माहिती नसण्याएवढं कोणी मुर्ख असू शकत नाही असंही जॉन म्हणला.