अभिनेत्री कंगना रणौतचे अनेक चाहते आहेत. ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’, ‘तनु वेड्स मनु’ अशा चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा कंगनाने सोशल मीडियापासून लांब राहणे पसंत केले आहे. तिचे स्वतःचे इंस्टाग्राम किंवा ट्विटर अकाऊंट नाहीये. तिची टीम आणि कंगनाची बहीण रंगोली चंडेल अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने सोशल मीडियापासून लांब असण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली की, “माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं मला कायम भान असतं. सोशल मीडियावर प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मी वेळ वाया घालवत नाही कारण, सोशल मीडियावर कोणत्याच प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. माझ्या बहिणीला कायम असं वाटतं की, मी अनेक चांगल्या गोष्टी करते पण, मी त्याविषयी कधीच बोलत नाही. यामुळे लोक माझ्या सोशल मीडियावर नसण्याचा फायदा घेतात.”

कंगना म्हणाली की, “माझी बहीण माझे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मला ही गोष्ट खूप हास्यास्पद वाटते.पण, तिच्यामते ही महत्त्वाची गोष्ट आहे. जिथे प्रश्नांची उत्तरं शोधता येत नाहीत अशा गोष्टीवर मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. मी लोकांना हॉस्पिटल बांधायला मदत केली आहे. याशिवाय मी माझ्या योग प्रशिक्षकांना अडीच कोटी रुपयांचं घर भेट म्हणून दिलं आहे. या गोष्टी कोणालाच माहित नाहीयेत कारण, मी या गोष्टींविषयी कधीच बोलत नाही. माझ्या मागील काही रिलेशनशिप्समध्ये मी कोणतेच व्हिडीओ किंवा फोटो काढले नव्हते. आजकाल कोणतीही गोष्ट फोटो किंवा व्हिडीओच्या पुराव्याने सिद्ध करावी लागते. मी असं नाही करू शकत. माझ्यासाठी ही गोष्ट खूप विचित्र आहे.”

सध्या कंगना ‘पंगा’ चित्रपटाची तयारी करत आहे. कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट एका कब्बडीपटूच्या जीवनावर आधारित आहे. तसेच या चित्रपटात कंगनासह जस्सी गिल, रिचा चड्ढा, पंकज त्रिपाठी आणि नीना त्रिपाठी हे कलाकार देखील झळकणार आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.