काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबूनं बॉलिवूडबाबत एक विधान केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. खासकरून बॉलिवूडमध्ये यावर खळबळ माजली. कारण “मी बॉलिवूडला परवडणार नाही त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी वेळ वाया घालवणार नाही.” असं महेश बाबूनं म्हटलं होतं. यावर काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला विरोध करत टीका केली तर काहींनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं महेश बाबूच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महेश बाबूचं कौतुक करत तिने त्याला स्पष्ट पाठिंबा दिला आहे.

आगामी चित्रपट Sarkaru Vaari Paata च्या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत महेश बाबूला, ‘तू हिंदी चित्रपटांमध्ये कधी काम करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना महेश बाबू म्हणाला, “मला नाही माहीत कदाचित हे फारच उद्धटपणाचं वाटेल. मला हिंदीमधून काही ऑफर मिळाल्या आहेत. पण मला वाटतं बॉलिवूडला मी परवडणार नाही. मग मी माझा वेळ का वाया घालवू. ज्याप्रकारे मला इथे सन्मान मिळत आहे. स्टारडम मिळत आहे. तो पाहता मी माझी इंडस्ट्री सोडून दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा विचारही करू शकत नाही.”

आणखी वाचा- “बलात्कार म्हणजे सरप्राइज सेक्स…” जेव्हा सनी लिओनीचं ट्वीट ठरलं होतं वादग्रस्त, वाचा नेमकं काय घडलं

महेश बाबूच्या या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना रणौतनं एका मुलाखतीत भाष्य केलं. महेश बाबूच्या वक्तव्यावर कंगनानं सहमती दर्शवली. ती म्हणाली, “हे जे त्याने म्हटलंय ते खरं आहे. मी याच्याशी सहमत आहे. मला माहीत आहे की त्याला बऱ्याच ऑफरही मिळत असतील. त्याच्या पिढीतील अभिनेत्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला देशात नंबर वन बनवलं आहे. त्यामुळे असे कलाकार बॉलिवूडला परवडणारच नाही.”

कंगना पुढे म्हणाली, “त्यानं त्याच्या इंडस्ट्रीसाठी आदर दाखवला आहे आणि हे कोणी नकारू शकत नाही की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोणतीही गोष्ट सहज मिळालेली नाही. त्यासाठी त्यांना मागची १०-१५ वर्षं कठोर परिश्रम करावे लागले आहेत. या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकायला हव्यात.”

आणखी वाचा- कतरिना कैफ खरंच आहे का गरोदर? पती विकी कौशलनं अखेर चर्चांवर सोडलं मौन

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर कंगना रणौत लवकरच ‘धाकड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्या महत्त्वापूर्ण भूमिका आहेत. येत्या २० मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader