बॉलिवुडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आला आहे. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आलेल्या ‘संजू’ या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आता तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगणा रणौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यासोबतच कंगनानेही ही माहिती शेअर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या बायोपिकसाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र अखेर या चित्रपटात कंगनाची वर्णी लागली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक विजय या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून हा चित्रपट तामिळ आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाचं नाव ‘जया’ असं असेल तर तामिळमध्ये ‘थलाइवी’ असं असणार आहे. दिग्दर्शक विजय यांनी यापूर्वी ‘मद्रासपट्टिनम’ आणि ‘देइवा थिरुमगाल’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

“जयललिता या देशातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक होत्या. त्यांच्या जीवनातील चढ-उतार प्रेक्षकांसमोर यावेत यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा मी निर्णय घेतला. या चित्रपटामध्ये जयललिता यांचा करारी भाव, त्यांची कणखरता, निर्णयक्षमता हे सारं पडद्यावर साकारण्यासाठी कंगना योग्य अभिनेत्री आहे. ती या भूमिकेला नक्कीच न्याय देऊन शकेल”, त्यामुळे जयललिता यांच्या भूमिकेसाठी मी तिची निवड केली आहे.

उत्कृष्ट अभिनयशैली आणि तितक्याच ताकदीने भूमिकेला दिलेला न्याय यामुळे बॉलिवूड क्वीन कंगणा रणौतने बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करुन दाखविलं आहे. कंगणाची मुख्य भूमिका असलेला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाच्या यशानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून ती लवकरच ‘जया’ या चित्रपटात झळकणार आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची निर्मिती विब्री मीडिया प्रोडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे

 

Story img Loader