बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. आता कंगनाने एक ट्वीट करत तिची आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची यशाची कहाणी सांगत त्यांच्या प्रवासाची तुलना केली आहे.

कंगनाचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. “१५ वर्षांपूर्वी आज ‘गॅंगस्टर’ प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान जी आणि माझी आतापर्यंतची सर्वात मोठी यशोगाथा आहे. पण शाहरुख हे दिल्लीचे होते, कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतलं होतं आणि त्यांचे आई-वडील हे चित्रपटसृष्टीत सक्रिय होते, मला इंग्रजीचा एक शब्दसुद्धा येत नव्हता, शिक्षण नाही, हिमाचल प्रदेशमधील एका दुर्गम गावातून आले होते,” अशा आशयाचे ट्वीट करत कंगनाने शाहरुख खान आणि तिच्या यशोगाथेची तुलना केली आहे.

‘गॅंगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘गॅंगस्टर’मध्ये कंगनाने सिमरनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासूने केले होते. या चित्रपटात कंगनासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता इम्रान हाश्मी आहे. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला असून महेश भट्ट हे या चित्रपटाचे निर्माते होते.

दरम्यान, कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘तेजस’ या चित्रपटात भारतीय वायु सेनेच्या पायलेटच्या भूमिकेत कंगना दिसणार आहे.

Story img Loader