करोनाचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन वारंवार लांबणीवर पडत आहे. मात्र कंगना रणौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट नियोजित दिवशीच प्रदर्शित होणार आहे. कंगनाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसंच आपण बॉलिवूड वाचवण्यासाठी पुढे आल्याचंही तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तरन आदर्श यांनी ‘थलायवी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल ट्वीट केलं आहे. यात त्यांनी प्रदर्शनाच्या तारखेत बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. येत्या २३ एप्रिलला हिंदी, तमीळ, तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, “त्यांनी मला इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले. ते सगळे एकत्र येऊन मला त्रास देत होते. पण आज बॉलिवूडचे ठेकेदार करन जोहर आणि आदित्य चोप्रा लपून बसले आहेत. सगळे मोठे हिरो आज लपून बसले आहेत पण कंगना तिच्या टीमसोबत १०० कोटी बजेटच्या चित्रपटासोबत बॉलिवूड वाचवायला येत आहे.”

पुढे तिने अजून एक ट्विट केलं आहे ज्यात ती स्वतःला बॉलिवूडची तारणहार तसंच आई म्हणवते.

यात ती म्हणते, “इतिहासात सुवर्णाक्षरात ही नोंद होईल की बाहेरून आलेली, सावत्रपणाची वागणूक मिळालेली एक व्यक्तीच त्यांची तारणहार ठरली. आपण सांगू शकत नाही आयुष्य आपल्याला कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल आणि जर हे झालं तर “बुलीवूड”ची ही चिल्लर पार्टी पुन्हा कधीच आपल्या आईविरोधात एकत्र येऊ शकणार नाही. कारण, आई ही आई असते.”

बहुचर्चित ‘थलायवी’ या चित्रपटासोबतच कंगनाचे ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे दोन चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. ‘तेजस’मध्ये ती शिख सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर ‘धाकड’ या ऍक्शनपटात ती एजंट अग्नी ही भूमिका साकारत आहे.

Story img Loader